Twinkle Khanna was called Rishi Kapoor’s illegitimate daughter : बॉलीवूडचे दिवंगत दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आणि ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया यांनी ‘बॉबी’ चित्रपटातून एकत्र करिअरची सुरुवात केली होती. मात्र, एका काळात सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची अनौरस मुलगी असल्याची अफवा जोरदार पसरली होती. ट्विंकलने स्वतः काजोल आणि आलिया भट्ट यांच्यासमोर या मजेशीर पण तितक्याच विचित्र प्रसंगाचा उलगडा केला आहे. ऋषी कपूर यांच्या एका वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावल्याने हा सगळा गोंधळ उडाला होता.
आलिया भट्ट व वरुण धवन यांनी काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी वरुण धवनने ऋषी कपूर यांच्याबरोबरची आठवण सांगितली आणि ट्विंकल खन्नाने नंतर तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला.
लोकांना वाटायचं ट्विंकल खन्ना ऋषी कपूरची अनौरस मुलगी आहे
ट्विंकल खन्नाने ऋषी कपूर यांची सून आलियाला एक विनोदी प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “आलियाच्या सासऱ्यांमुळे मी जवळजवळ कपूर झाले होते. माझ्या वाढदिवशी त्यांनी ट्विट केलं होतं. ‘अरे तुला माहित आहे का… तू तुझ्या आईच्या पोटात असताना, मी तिच्यासाठी गाणी गायली होती.’ त्यामुळे सर्वांना वाटलं की मी त्यांची अनौरस मुलगी आहे. त्या ट्विटनंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं, शेवटी त्यांना माफी मागत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.”
ट्विंकल खन्नाने जे सांगितलं ते ऐकून काजोल आश्चर्यचकित झाली. दुसरीकडे आलिया भट्टचा मात्र हे सगळं ऐकून गोंधळ उडाला, त्याकडे काजोलने लक्ष वेधलं. त्यावर लगेच “मी तुझी नणंद नाही, ती चूक होती,” असं ट्विंकल खन्ना आलियाला म्हणाली. यावर कशी प्रतिक्रिया द्यावी ते आलियाला सुचत नाहीये, असं वरुण गमतीत म्हणाला.
दरम्यान, ट्विंकल खन्नाचं ऋषी कपूर यांच्याशी एक खास कनेक्शन आहे. ते असं की ट्विंकल खन्नाची आई, ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी ऋषी कपूर यांच्याबरोबर १९७३ साली आलेल्या ‘बॉबी’ चित्रपटातून एकत्र बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
वरुण धवनला ऋषी कपूर काय म्हणाले होते?
वरुणने स्टुडंट ऑफ द इयरमध्ये ऋषी कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं, तेव्हाची एक आठवण सांगितली. “मला आठवतंय की मी सिद्धार्थ मल्होत्राबरोबर फुटबॉलचा एक सीक्वेन्स केला होता. त्यावेळी आमच्या केसांमध्ये खूप जेल लावण्यात आलं होतं, त्यामुळे ऋषीजी खूश नव्हते. ते नेहमी म्हणत, ‘हे काय आहे? तुमचे केस हलत नाहीत. गारपीट असो वा वादळ, तुमचे केस असेच राहतात. तुम्ही फुटबॉल खेळता, तेव्हा तुमचे केस उडायला पाहिजेत.’”
ऋषी कपूर वरुणजवळ यायचे आणि त्याच्या केसांना स्पर्श करायचे. नंतर त्यांनी दिग्दर्शक करण जोहरला फोन करून याबद्दल तक्रार केली. करणने वरुणला समजावलं. मग वरुण म्हणाला, ‘माझ्या केसांमध्ये जेल आहे.’ ऋषी कपूर रागावले आणि त्यांनी आग्रह धरला, “केसांमधील हे जेल काढणार नाही, तोपर्यंत मी शूटिंग करणार नाही.” अखेर वरुणला केसांमधील जेल काढावं लागलं होतं, त्यानंतर ऋषी कपूर शूटिंगसाठी तयार झाले.
