Twinkle Khanna On father Rajesh Khanna: ट्विंकल खन्ना ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने १९९५ ला प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या सिनेमातून पदार्पण केले होते. या सिनेमात ट्विंकलबरोबर बॉबी देओलही प्रमुख भूमिकेत होता. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

ट्विंकल खन्नाने ‘जोडी नंबर १’, ‘जोरू का गुलाम’, ‘चल मेरे भाई’, ‘बादशाह’, ‘जुल्मी’ अशा अनेक सिनेमांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ट्विंकल दिग्गज अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. राजेश खन्ना हे भारतातील पहिले सुपरस्टार मानले जातात. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. त्यांच्या भूमिकांची आजही चर्चा होताना दिसते. याबरोबरच, अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या त्यांच्या स्पर्धेचीदेखील कायम चर्चा होते. राजेश खन्ना जितके त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले, तितकचे ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत राहिले.

डिंपल कपाडिया व त्यांच्या वयात १४ वर्षांचे अंतर होते. लग्न झाले त्यावेळी डिंपल कपाडिया फक्त १६ वर्षांच्या होत्या. त्यांना दोन मुली झाल्या. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. ते वेगळे झाले. असे असले तरी मुलींच्या मनात राजेश खन्नांबद्दल कायमच आदर असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.

“माझ्या वडिलांना पहिलं मूल…”

काही दिवसांपूर्वी ट्विंकलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिचे वडील तिला कोणत्या नावाने हाक मारायचे याबद्दल खुलासा केला होता. तिने लिहिलेले, “माझ्या वडिलांना पहिलं मूल मुलगा हवा होता का याबद्दल मला माहीत नाही. मात्र, माझ्या जन्मावेळी त्यांनी आईला एकच गोष्ट सांगितली होती की माझ्या ३१व्या वाढदिवशी, तू मला आयुष्यातील सर्वात सुंदर भेट दिलीस. ते मला कधीच टीना बेबी म्हणाले नाहीत, नेहमी टीना बाबा असंच म्हणायचे. माझं संगोपन माझ्या आसपासच्या इतर मुलींपेक्षा वेगळ्या पद्धतीने झालं होतं, त्यावेळी मला याची जाणीव नव्हती.”

‘मिसेस फनीबोन्स रिटर्न्स’ या पुस्तकात अभिनेत्रीने वडिलांच्या आठवणी आजही जिवंत असल्याचे लिहिले. ते असे की, जवळच्या व्यक्तीला गमावण्याचं दुःख सतत होत नाही किंवा ते दु:ख होणं पूर्णपणे थांबतही नाही, ते आयुष्यातील शांत क्षणांमध्ये दडलेलं असतं आणि अनपेक्षित वेळी पुन्हा समोर येतं. कधी रेडिओवर एखादं गाणं ऐकताना तर कधी डोळ्यांत काजळ लावताना आरशात माझ्या चेहऱ्याकडे पाहताना मला त्यांचेच डोळे दिसतात.”

राजेश खन्नांना चाहते प्रेमाने ‘काका’ म्हणून ओळखायचे. त्यांनी १९६९ ते १९७१ या काळात सलग १७ सुपरहिट चित्रपट दिले होते. त्यांना त्यांच्या कारकि‍र्दीत फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार तीन वेळा मिळाला; तर या पुरस्कारासाठी त्यांना एकूण १४ वेळा नामांकन मिळाले होते. १८ जुलै २०१२ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरविले.