Twinkle Khanna Tukaram Mundhe FDA Kitchen Raid: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे छोट्या गाड्यांपासून मोठमोठ्या हॉटेल्स मालकांपर्यंत सर्वांच्याच मनात धडकीच भरली आहे. आता अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक करीत स्वतःच्याच स्वयंपाकघरावर ‘रेड’ मारल्याचं सांगितलं आहे.
ट्विंकल खन्नानं इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली. त्यामध्ये तिनं हॉटेलमध्ये आलेला अनुभव आणि घरातील स्वयंपाकघरावर केलेल्या कारवाईचा उल्लेख केला आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर ‘तुकाराम मुंढे यांनी हॉटेल चेक केलंय का’ असा प्रश्न ट्विंकलनं विचारला आणि त्यानंतर पनीर ऑर्डर केल्याचं ट्विंकल खन्नानं सांगितलं आहे.
त्यामागे FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा हात – ट्विंकल खन्ना
ट्विंकल खन्नानं बागेमध्ये मिळणाऱ्या ‘बुढ्ढी के बाल’चा रंग उडाल्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. तिनं लिहिलं, “आधी सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी जेव्हा मी जत्रेमध्ये फिरायला जायचे तेव्हा ‘बुड्ढी के बाल’ ही गोड कापूसकँडी फ्लोरोसंट गुलाबी रंगाची असायची; पण आता तो गुलाबी रंग उडाला आहे. आता टच-अप करण्यापूर्वी जसे माझे केस दिसतात, अगदी तशीच ही कापूसकँडी दिसतीये. आता खरं तर ‘बुढ्ढी के बाल’चं नाव योग्य ठरत आहे. हा गुलाबी रंग गायब झालाय, त्यामागे एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हात आहे.”
ट्विंकल खन्नानेची स्वत:च्याच स्वयंपाकघरावर अचानक धाड
पुढे तिनं लिहिलं, “तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे शेकडो रेस्टॉरंट्स पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली आहेत, ज्यात ‘डॉमिनोज’चाही समावेश आहे. जिथं मुंढे जातात, तिथं मुंड्या (मान) खाली होतात.. मुंढेंकडून प्रेरणा घेऊन मीसुद्धा घरातील स्वयंपाकघरावर अचानक धाड टाकली. तिथं एक शाही मसाला हा मुघलाच्या काळातच ‘एक्स्पायर’ झालेला होता. ज्यांना आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघलांचं अस्तित्व पुसून टाकायचं आहे, त्यांनी आधी घरातील दुपारच्या जेवणापासून सुरुवात केली पाहिजे.”
‘मुंढे मार्टिनी’ ठेवलंय नाव
त्यानंतर ट्विंकल खन्नानं एका हॉटेलमधील अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी एका रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर वेटरला, “मुंढेंनी तुमच्या रेस्टॉरंटची तपासणी केली आहे का?” असं विचारलं. त्यावर वेटरनं ‘हो, मागच्या आठवड्यात तपासणी झालीये,’ असं सांगितलं. हे हॉटेल मुंढेंनी तपासल्यामुळे मी निर्धास्तपणे पनीर टिक्का मागवलं. मात्र, पनीरचा तुकडा तोंडात जाण्याआधीच तो खाली पडून थेट माझ्या मार्टिनीमध्ये (ऑलिव्ह किंवा लेमन ट्विस्टपासून बनवलं जाणारं कॉकटेल ड्रिंक) पडला. त्यामुळे आता वेगळं ड्रिंक मागविण्यापेक्षा याचंच नाव ‘मुंढे मार्टिनी’ ठेवलं. त्यामध्ये जिन, व्हर्माउथ, ऑलिव्ह आणि पनीरचं भन्नाट मिश्रण आहे.”
