Actress Twisha Sharma Suicide Case : अभिनेत्री आणि मॉडेल त्विशा शर्माने १२ मे रोजी आत्महत्या केली. तिच्या सासरी तिचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तर त्विशाच्या सासूबाईंनीही काही दावे केल्याचं समोर आलं आहे.
त्विशाच्या आई-वडिलांनी तिचा नवरा समर्थ सिंग आणि सासू गिरिबाला सिंह यांच्यावर मानसिक छळ आणि हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. त्विशा माजी मिस पुणे होती. तिने काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातही काम सुरू केलं होतं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं असून, तिचा नवरा सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्विशाच्या आई-वडिलांनी केले आरोप
माध्यमांच्या वृत्तांनुसार, त्विशा शर्मा भोपाळमधील कटारा हिल्स परिसरात असलेल्या नवरा समर्थ सिंगच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या दोघांचं लग्न डिसेंबर २०२५ मध्ये झाले होतं. लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत त्विशाचा मृत्यू झाला. एएनआयच्या वृत्तानुसार, त्विशाच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर लग्नानंतर सतत मानसिक छळ आणि हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात समर्थ सिंह आणि त्याची आई गिरिबाला सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरिबाला सिंग या निवृत्त न्यायाधीश आहेत.
पती फरार, सासूबाईंनी केले दावे
पोलिस तपासापासून दूर पळत असल्याचा आरोप असलेल्या समर्थ सिंग याला अटक करण्यासाठी मदत करणाऱ्याला १० हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्याची आई गिरिबाला सिंग यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्विशाच्या कुटुंबीयांचे वकील अनुराग श्रीवास्तव यांनी दावा केला की, लग्नानंतर सात वर्षांच्या आत झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार काही विशेष तरतुदी लागू होतात. त्यामुळे जामीन अर्ज मंजूर होऊ नये, असा त्यांचा युक्तिवाद होता. तपास सुरू असताना, त्विशाच्या सासरच्या लोकांनी दावा केला की, ती काही व्यसनांशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त होती आणि तिच्यावर मानसिक आरोग्याचे उपचार सुरू होते. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार ३३ वर्षीय त्विशा मूळची नोएडाची होती. महत्त्वाचं म्हणजे तिने आत्महत्या केली तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. १२ मे २०२६ रोजी तिने भोपाळमधील तिच्या सासरच्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. माध्यमांच्या वृत्तानुसार मृत्यूपूर्वी त्विशाने तिच्या मीनाक्षी नावाच्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर मॅसेज केले होते. तिचे चॅट्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘एनडीटीव्ही’च्या माहितीनुसार त्विशाचा नवरा समर्थ सिंग हा पेशाने वकील आहे. २०२४ मध्ये एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २०२५ मध्ये दोघांनी थाटामाटात लग्न केलं. मात्र, हा प्रेमविवाह अवघ्या ६ महिन्यांतच हुंड्याच्या छळात बदलला, असा गंभीर आरोप त्विशाच्या वडिलांनी केला आहे.
या चित्रपटात केलंय काम
दरम्यान, त्विशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्विशाने कॉर्पोरेट क्षेत्रात जाण्यापूर्वी चित्रपट आणि ब्युटी पेजंटमध्ये काम केलं होतं. ती माजी मिस पुणे म्हणून ओळखली जायची. तिने याव्यतिरिक्त काही इतर कलाकृतींमध्येही सहभाग घेतला होता.
तिचा शेवटचा चित्रपट Mugguru Monagallu हा २०२१ मधील तेलुगू कॉमेडी-थ्रिलर होता. या चित्रपटात दिकक्षीत शेट्टी, श्रीनिवास रेड्डी आणि Vennela Rama Rao यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्विशाने २०१८ मध्ये ‘जरा संभाल के’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टीपासून दूर जात रेस्टॉरंट क्षेत्रात मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम सुरू केलं होतं.
