रणबीर कपूरने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बर्फी’ सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं होतं. यामध्ये त्याच्यासह प्रियांका चोप्रा आणि इलियाना डिक्रूझ या अभिनेत्री झळकल्या होत्या. याशिवाय लोकप्रिय ज्येष्ठ मराठी अभिनेते उदय टिकेकर यांनी या सिनेमात हिरोईनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उदय टिकेकर यांनी रणबीरसह काम करण्याचा अनुभव नेमका कसा होता, त्याचा मूळ स्वभाव कसा आहे याबाबत खुलासा केला आहे.

उदय टिकेकर यांनी रणबीरबद्दल सांगताना सिनेमातल्या एका सीनचं उदाहरण दिलं आहे. याशिवाय रणबीर प्रचंड विनम्र आहे असंही ते म्हणाले. ‘अभिजीत मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत उदय टिकेकर सांगतात, “आता ‘बर्फी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, माझा पहिलाच सीन होता की, मी दरवाजावर जातो आणि नॉक करतो. रणबीरला ऐकू येत नसतं म्हणून तो जरा उशिरा दार उघडतो. मी नॉक करत राहणार आणि नंतर रणबीरला दरवाजाचं ते वरचं लॉक लागणार असा एक तो सीन होता. दोन-तीन वेळा आम्ही केलं पण, तो सीन होत नव्हता.”

उदय टिकेकर पुढे म्हणाले, “आता ‘बर्फी’ हा अनुराग बासू यांचा सिनेमा आहे. त्याआधी सुद्धा मी अनुरागबरोबर वर्षानुवर्षे अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे मी त्याला विचारलं, की मी रणबीरला त्या सीनबद्दल सांगू का? तसेच रणबीरलाही विचारलं, तुला मी सांगू का…तो म्हणाला, प्लीज-प्लीज सर दाखवा. मग मी त्याला दाखवलं की अशाप्रकारे रिअ‍ॅक्ट कर…त्यात मग बदल झाला आणि त्यानंतर सगळं एका टेकमध्ये ओके झालं. बरं त्यानंतर रणबीर मला स्वत:हून थँक्यू म्हणाला.”

“याशिवा एकदा रणबीर सेटवर एन्ट्रीसाठी उभा होता आणि तिथेच लाइट कटर होता, काहीतरी झालं आणि तेव्हाच तो लाइट कटर त्याच्या डोक्यावर आपटला. एकतर ती लोखंडी फ्रेम असते… मी तेव्हा शॉटला उभा होतो. बरं त्याच्याजागी दुसरा कुणीही अभिनेता असता तर त्यावेळी भडकला असता असं मला वाटतं. तो लगेच बाजूला गेला…सगळे त्याला सॉरी-सॉरी म्हणत होते. पण, तो काहीच बोलला नाही…सेटवरचं वातावरण त्याने १ टक्काही गरम किंवा अशांत होऊ दिलं नाही. याला तुम्ही डेडिकेशन, त्याची विनम्रता म्हणू शकता. तो खूप हुशार आहे. मी म्हटलं ना…ज्याला शिकायची इच्छा असेल तो मोठा होणारच! त्यात अनुरागसारखा मोठा दिग्दर्शक असेल तर अजून काय हवं.” असं उदय टिकेकर यांनी सांगितलं.