Udit Narayan’s first wife alleges: उदित नारायण यांनी आजवर एकापेक्षा एक गाणी गात बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांची तुझको ना देखू, गुन गुन गुना, ओढणी, परदेसी परदेसी, सोना कितना सोना है, अशी अनेक गाणी लोकप्रिय ठरली.
आता उदित नारायण हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. उदित नारायण यांची पहिली पत्नी रंजना झा त्यांच्यावर आरोप केले आहेत. उदित नारायण यांच्याविरुद्ध त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
रंजना त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हणाल्या की, आम्ही ७ डिसेंबर १९८४ रोजी लग्न केले. जेव्हा उदित नारायण करिअरसाठी पुन्हा मुंबईला गेले, तेव्हा ते कधीच परत आले नाहीत. कयामत से कयामत तक या मन्सूर खान यांच्या चित्रपटातून उदित नारायण यांना यश मिळाले. या चित्रपटात आमिर खान आणि जुही चावला प्रमुख भूमिकांमध्ये होते.
काही काळानंतर रंजना यांना समजले की, उदित नारायण यांनी मुंबईत दीपा नावाच्या महिलेशी लग्न केले आहे. त्यांना मुलगाही झाला आहे, ज्याचे नाव आदित्य असे आहे. जेव्हा जेव्हा रंजना यांनी उदित नारायण यांना त्याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा गायकाने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.
“माझे गर्भाशय काढले…”
‘डेक्कन हेराल्ड’नुसार, १९९६ पर्यंत त्यांना सतत दु:खाचा सामना करावा लागला. उदित नारायण आणि त्यांचे भाऊ संजय कुमार झा, ललित कुमार झा यांनी वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली त्यांना कोणतीही माहिती न देता, त्यांचे गर्भाशय काढले.
रंजना यांनी दावा केला की, उदित नारायण आणि त्यांच्या भावांनी मला दिल्लीतील एका खासगी दवाखान्यात नेले होते. तिथे त्यांनी माझ्या परवानगीशिवाय किंवा मला माहिती दिल्याशिवाय माझे गर्भाशय काढले. त्यावेळी दीपा नारायणदेखील तिथे उपस्थित होत्या. उपचारानंतर बऱ्याच काळाने गर्भाशय काढल्याचे मला माहीत झाले, असे रंजना यांनी सांगितले.
रंजना यांनी असेही सांगितले की, जेव्हा त्या २००६ मध्ये उदित नारायण यांच्या मुंबईतील घरी गेल्या तेव्हा त्यांनी तिथे येऊ दिले नाही.दीपा आणि उदित नारायण यांनी शिवीगाळ केली. नेपाळमध्ये जेव्हा त्या सासरच्या घरी गेल्या तेव्हा सासरच्या मंडळींनीदेखील त्यांचा अपमान केला. तेव्हापासून त्या त्यांच्या वडिलांच्या घरी बिहारमधील सुपौल या गावी राहतात.
याआधी रंजना यांनी सुपौलच्या कौटुंबिक न्यायालयात आणि महिला आयोगाकडे उदित नारायण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावेळी उदित नारायण यांनी रंजना यांच्याशी त्यांचे लग्न झाले असल्याचे मान्य करत पोटगी देण्याचे वचन दिले होते; पण उदित नारायण यांनी वचन पाळले नाही. त्यामुळे आता रंजना यांनी तेथील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
‘बिहार तक’शी बोलताना त्या म्हणाल्या, “उदित यांनी दिलेलं वचन पाळलं नाही. त्यामुळे मला महिला पोलीस ठाण्यामध्ये यावं लागलं. मी काही दिवसांपासून आजारी आहे. म्हणून मला त्याच्या पाठिंब्याची गरज आहे; पण तो मदत करत नाही. एका पत्नीला आदर हा मिळालाच पाहिजे. मी त्यांची पत्नी आहे, हे त्यांनी मान्य केलं आहे; पण ते त्यांची कर्तव्यं पूर्ण करत नाहीत. एका पत्नीला फक्त आदर पाहिजे असतो; बाकी काही नाही.”
रंजना यांच्या वकिलांनीदेखील असे सांगितले की, उदित नारायण यांनी तिला त्रास दिला आहे. उपचारादरम्यान तिला डॉक्टरांनी सांगितले की, तिचे गर्भाशय काढले आहे. तेव्हा रंजना यांना समजले की, उदित नारायण त्यांना त्रास देत आहेत आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे त्या आता पोलीस ठाण्यात आल्या आहेत.
