राजकुमार रावचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ (Prahaar – The Ujjwal Nikam Story) हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी रिलीज होणरा आहे. हा चित्रपट २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहणारे वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर चित्रपट बनवण्यास परवानगी देण्यापूर्वी त्यांनी निर्मात्यांसमोर एक अट ठेवली होती. ती काय होती? याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी स्वतः केला आहे.
‘इंडिया टुडे’शी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, “माझी पहिली अट ही होती की, चित्रपटात माझ्यासह इतर कोणत्याही पात्राचे उदात्तीकरण करण्यात येऊ नये. मी त्यांना असंही सांगितलं होतं की, या कायदेशीर प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व पात्रांची खरी नावं वापरली जावीत. त्यासाठी निर्मात्यांनी न्यायाधीश मदन लक्ष्मणदास तहिलियानी यांच्यासह प्रकरणाशी संबंधित लोकांकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे.” न्यायाधीश तहिलियानी यांनी ६ मे २०१० रोजी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती.
राजकुमार रावने उज्ज्वल निकमसारखं जगून दाखवलं
उज्ज्वल निकम यांनी पडद्यावर आपली भूमिका साकारण्यासाठी राजकुमार रावने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं. “मला राजकुमार रावचं खरंच कौतुक करायचंय. त्याने उज्ज्वल निकम यांच्यासारखं जगून दाखवलं. खटल्यातील मुद्दे आक्रमकपणे मांडण्यासाठी त्याने तोच जोश दाखवला. राजकुमार अतिशय शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. त्यामुळे मी ट्रेलर आणि इतर गोष्टी पाहून थक्क झालो. इतर वकिलांनी मला विचारलं, राजकुमार तुमच्याबरोबरच वावरत असतो का? त्यावर मी नाही, असं सांगितलं.”
राजकुमार रावने म्हणाला होता की, सिनेमाच्या शूटिंगपूर्वी तो उज्ज्वल निकम यांना भेटला नव्हता, कारण ते व्यग्र होते. त्यामुळे भूमिकेची तयारी करण्यासाठी त्याने न्यायालयातील युक्तिवादाचे त्यांचे व्हिडीओ पाहिले होते.
चित्रपटातील कलाकार
दरम्यान, अविनाश अरुण दिग्दर्शित ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. या चित्रपटात राजकुमार रावची मुख्य भूमिका आहे, तर कसाबच्या भूमिकेत मराठी अभिनेता ललित प्रभाकर आहे. त्याचबरोबर या चित्रपटात वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर व आशिष विद्यार्थी हे कलाकार आहेत.
