Uncha Lamba Kad remake song released : बॉलीवूडमध्ये सध्या जुन्या सुपरहिट गाण्यांचे रिमेक बनवण्याचा ट्रेन्ड सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान यांच्या ‘चुनरी चुनरी’ गाण्याचा रिमेक चर्चेत होता. यानंतर आता अक्षय कुमारच्या लोकप्रिय ‘उंचा लंबा कद’ या गाण्यालाही नव्या अंदाजात रिलीज करण्यात आले आहे. ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटातील नवे गाणे नुकतेच रिलीज झाले असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमारसह अभिनेत्री दिशा पाटनी झळकत आहे. दिशाचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अक्षय कुमार याचा ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट येत्या २६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच ‘उंचा लंबा कद फॉरेवर’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘वेलकम’ चित्रपटातील ओरिजनल गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय ठरले होते. आता याच गाण्याचा नव्या अंदाजात रिमेक करण्यात आला आहे. मूळ गाणे हे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. मात्र, या नव्या व्हर्जनमध्ये अक्षय कुमारसोबत दिशा पाटनी झळकत आहे. गाण्यातील प्रसिद्ध हूक स्टेप आणि दिशाची खास अदा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
रिमेकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
‘उंचा लंबा कद फॉरेवर’ गाण्यामध्ये दिशा पाटनीने काळ्या रंगाचा आकर्षक कट-गाऊन परिधान केला असून तिचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भावला आहे. तसेच लाल आणि गोल्डन रंगाच्या वन पीसमध्ये दिशाचे सौंदर्य खुलले आहे. गाण्यामध्ये अक्षय कुमारचाही स्टायलिश आणि हटके लूक पाहायला मिळत आहे. ‘उंचा लंबा कद फॉरेवर’ गाणे रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नव्या हटके अंदाजातील हे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. अनेकांनी कमेंट्स करत गाण्याचे आणि त्यातील नव्या अंदाजाचे कौतुक केले आहे; तर काही नेटकऱ्यांनी, “या गाण्यामध्ये कतरिना कैफ पाहिजे होती,” अशा कमेंट्स केल्या आहेत.
‘वेलकम टू द जंगल’ कधी होणार रिलीज?
‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट ‘वेलकम’ या लोकप्रिय कॉमेडी फिल्म फ्रँचायझीमधील पुढील चित्रपट असणार आहे. यामध्ये अनिल कपूर आणि सुनील शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्याचबरोबर दिशा पाटनी, रवीना टंडन आणि जॅकलिन फर्नांडिस देखील झळकणार आहेत. अहमद खानने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २६ जून रोजी ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘चुनरी चुनरी’ गाण्याच्या रिमेकवरुन वाद
अभिनेता वरुण धवनने ‘हे जवानी तो इश्क होना है’ चित्रपटामध्ये चुनरी चुनरी गाण्याचा रिमेक केला होता. मात्र, या रिमेकवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सलमान खानच्या ‘बीवी नंबर १’ या चित्रपटातील सुपरहिट ‘चुनरी चुनरी’ गाण्याचा रिमेक करण्यात आला. मात्र, यासाठी निर्माते व गायकाची परवानगी न घेण्यात आल्यामुळे गाणे वादामध्ये अडकले आहे. वरुण धवनचे हे ‘चुनरी चुनरी’ गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले नाही. नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.
