संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित झाल्यावर रणबीरसह मराठमोळ्या उपेंद्र लिमयेंचं देखील सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं. त्यांनी साकारलेल्या फ्रेडी पाटीलची भूमिका सुपरहिट ठरली होती. उपेंद्र लिमयेंचा कॅमिओ फक्त १० मिनिटांचा जरी असला, तरीही सर्वत्र चर्चा त्याच भूमिकेची झाली. पण, तुम्हाला माहितीये का सुरुवातीला उपेंद्र लिमयेंनी फ्रेडी पाटीलच्या भूमिकेसाठी नकार दिला होता. संदीप रेड्डी वांगाच्या टीमकडून दोनवेळा फोन आले पण, दोन्ही वेळा त्यांनी नकारच दिला होता.

मात्र, प्रत्यक्ष भेटीत संदीप रेड्डी वांगाने Animal सिनेमाची गोष्ट उपेंद्र लिमयेंना अशाप्रकारे नरेट केली की, त्यांनाही त्या पात्राचं महत्त्व समजलं आणि त्यांनी संदीपला होकार कळवला.

“फ्रेडी पाटील ही भूमिका एवढी वर्क होईल असं वाटलं होतं का?” यावर उपेंद्र लिमये ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “फ्रेडी पाटील वर्क होईल असं वाटलं होतं…पण, इतका तुफान वर्क होईल असं वाटलं नव्हतं. तो सीक्वेन्स शूट झाला, त्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला होता. त्यावेळी मी जेवायला बसलो आणि माझ्या व्हॅनिटीचं दार वाजलं. तेवढ्यात एक असिस्टंट दिग्दर्शक आला आणि तो म्हणाला, ‘सर दोन मिनिटं येता का? मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे.’ मग मी त्याच्याबरोबर गेलो आणि सेटवर पाहिलं तर…सेटवर पडद्यामागे काम करणारे सगळे कामगार आणि तांत्रिक बाजू सांभाळणारे लोक होते, ते सगळे फ्रेडी पाटीलची अगदी मजा घेऊन नक्कल करत होते…कारण, जस्ट तेव्हाच मी शॉट देऊन आलो होतो. त्या असिस्टंट दिग्दर्शकाने मला सेटवरचा तो सगळा माहोल दाखवला आणि म्हणाला, ‘सर हे निश्चित वर्क होणार… सेटवरच सगळे इम्प्रेस झालेत मग बाहेर तर हा सीन तुफान गाजणार आहे.”

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या सीनला प्रेक्षकांचं प्रेम मिळेल, असं मला वाटलं नव्हतं. मला तेव्हा माझा मुलगा म्हणाला होता, बाबा ‘अ‍ॅनिमल’मधील त्या सीनला तू नाही म्हणाला असतास तर तुला आयुष्यभर पश्चाताप झाला असता का? माझंही उत्तर होतं ‘हो’! खरंच मी नकार दिला असता तर, मला पश्चातापच झाला असता.”

“पण, या सगळ्यात संदीपचा मोठेपणा बघा किती आहे, त्याला मी सांगितलं, घरी मुलगा असं-असं म्हणत होता. यावर संदीप म्हणाला, ‘नाही सर…जर तुम्ही ही भूमिका केली नसती तर माझ्या फ्रेडी पाटीलचं काय झालं असतं?’ हा असा आहे संदीप रेड्डी वांगा! अशी सगळी चांगली माणसं मला आयुष्यात भेटली.” असं उपेंद्र लिमयेने सांगितलं.