संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ हा हाय-ऑक्टेन ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे. अशाप्रकारच्या सिनेमांमध्ये एक विशिष्ट एनर्जी, दमदार अॅक्शन, मॅडनेस आणि नाट्यमय घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. ‘अॅनिमल’ सुद्धा याच धाटणीतला हटके सिनेमा. यातील प्रत्येक पात्राची सिनेप्रेमींच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि अवघ्या १० मिनिटांसाठी स्क्रीनवर झळकलेला फ्रेडी पाटील सर्वत्र तुफान लोकप्रिय झाला. याच फ्रेडी पाटीलची भूमिका लोकप्रिय अभिनेते उपेंद्र लिमयेंनी साकारली आहे.
ज्या फ्रेडी पाटीलला इतकी लोकप्रियता मिळाली, त्याच भूमिकेसाठी सुरुवातीला उपेंद्र लिमयेंनी नकार दिला होता. शेवटी तिसऱ्या फोननंतर ते दिग्दर्शकाला ऑफिसमध्ये जाऊन भेटले आणि याचठिकाणी त्यांनी आपलं मत बदलून सिनेमासाठी होकार दिला. नुकत्याच ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.
उपेंद्र लिमये म्हणाले, “संदीप रेड्डी वांगा हा जबरदस्त दिग्दर्शक आहे. त्याचा ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट मी लॉकडाऊनमध्ये पाहिला होता. काही जणांनी मला सुचवलं होतं की, ‘अर्जुन रेड्डी’ ओटीटीवर आहे आवर्जून बघ, संदीप रेड्डी वांगा म्हणून माणूस आहे आणि त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. तो या जनरेशनचा राम गोपाल वर्मा आहे, असं मी अनेकांकडून ऐकलं होतं. अर्थात, ‘अर्जुन रेड्डी’ सिनेमा मलाही आवडला. त्याचदरम्यान मी ‘मडगाव एक्स्प्रेस’ या हिंदी सिनेमात काम करत होतो. त्यामध्ये माझा एक मेजर रोल होता आणि त्याचवेळी मला संदीप रेड्डी वांगाच्या टीमकडून फोन आला होता.”
“रणबीर कपूरबरोबर एक सीक्वेन्स आहे, तुम्ही करणार का? असं मला संदीपच्या टीमकडून विचारलं. मी म्हणालो ‘नाही. कारण, एवढ्याशा भूमिकेचं काय कौतुक असा विचार माझ्या डोक्यात आला. त्यानंतर त्यांच्या टीमकडून मला दोन-तीनवेळा फोन आला. त्याचं नाव होतं, जितेंद्र भोसले. जितू तिसऱ्या फोनला मला म्हणाला, ‘ठिक आहे तुम्ही काम नका करू, फक्त एकच काम कराल का संदीप रेड्डी वांगाबरोबर १० मिनिटांची मिटींग कराल का? त्यांना तुम्हाला भेटायचं आहे.’ आता आधीच ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपट पाहिल्याने मला तो माणूस आवडला होता, मेकर म्हणून तो कमाल आहे. म्हणून मी त्याच्या ऑफिसमध्ये जायचं ठरवलं.”
“पण, ऑफिसमध्ये भेट घेतल्यावर त्याने ज्याप्रकारे मला तो सीन नरेट केला, तेव्हा मला वाटलं फारच अफलातून सीन आहे. त्या भूमिकेचं स्क्रीनप्लेमधील स्थान जबरदस्त आहे. एकदम पूर्ण बॅटिंगच आहे…मी मग त्याला सांगितलं, मी पाहुणा कलाकार म्हणून हा सीन करेन. तो म्हणाला, दिलं तुला टायटल! बरं त्याने मला खरंच म्हटल्याप्रमाणे टायटल दिलं आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर यांच्यानंतर गेस्ट अपीयरेन्स मध्ये माझं नावं येतं.” असं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “फ्रेडी पाटीलच्या भूमिकेसाठी काय-काय करता येईल, याच्या आयडिया तू घेऊन ये, असंही त्याने मला सांगितलं. संदीप गूड लिसनर आहे, तो प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकून घेतो. आत्मनिर्भर भारत हा पंच सुद्धा मला शेवटच्या क्षणी सुचला होता. मग त्याने काही डायलॉग ठेवले आणि काही ट्रिम केले…तो संपूर्ण सीनच जबरदस्त झाला होता. त्या सीनमधल्या मोठमोठ्या मशिन्स, त्याच्या आर्ट डिरेक्टरने त्यावर किती मेहनत घेतलीये, हे सगळं त्याने मला दाखवलं होतं. जो सीन त्याने पडद्यावर दाखवलाय, तो त्याने आधीच Visualise केलेला होता. संदीप अत्यंत स्मार्ट दिग्दर्शक आहे.”
