Govind Namdev Quits Kala Heeran Movie : अभिनेता सलमान खानच्या जीवनावर आधारित कथित ‘काला हिरण’ चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणाच्या वादावर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. सलमानने ‘काला हिरण’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविल्याने चित्रपट वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. सलमान खानने आक्षेप घेतल्यानंतर अनेक कलाकरांनी त्यातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. ‘वॉन्टेड’ चित्रपटात सलमानसह काम केलेले ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांनीही चित्रपट सोडल्याचा निर्णय जाहीर केला आहे. निर्मात्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप करीत सलमान खानची बदनामी करणाऱ्या चित्रपटात काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिनेते गोविंद नामदेव यांनी ‘वॉन्डेट’ चित्रपटामध्ये पोलीस कमिशनरची भूमिका साकारली होती. त्यांनी आता ‘काला हिरण’ चित्रपट सोडला आहे. याआधी सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी एका अभिनेत्याने ‘काला हिरण’ चित्रपट सोडून दिला होता. विशेष म्हणजे या कलाकाराने दोन दिवसांचे शूटिंगदेखील केले होते. अभिनेता सोनू मिश्रा याने मागील वर्षी ‘सिकंदर’ या चित्रपटात सलमानसह काम केले होते.
सोनू मिश्रा हा ‘काला हिरण’ या चित्रपटामध्ये सलमान खानची प्रमुख भूमिका साकारत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, वाद लक्षात आल्यानंतर सोनूने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सलमनासह काम केलेले कलाकार हे काला हिरण या चित्रपटातून माघार घेत आहेत.
हळूहळू चित्रपटाचा हेतू लक्षात आला – सोनू
‘बॉलीवूड क्रेझी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनू मिश्रा म्हणाला, “या चित्रपटासाठी खूप उत्सुक होतो. कारण- सुपरस्टार सलमान खान यांच्यावर आधारित भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मी चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले होते. मात्र, हळूहळू चित्रपटाचा हेतू काय आहे, हे माझ्या लक्षात येऊ लागले. गेली १५-१६ वर्षे अभिनय क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटाचा भाग व्हायला मला आवडले नसते. निर्मात्यांचा स्वतःचा दृष्टिकोन असू शकतो; पण जर एखाद्या चित्रपटात सलमान खान यांना नकारात्मक पद्धतीने दाखवले जात असेल, तर त्या चित्रपटात काम करण्यापेक्षा मी इतर प्रकल्पांमध्ये काम करण्यास प्राधान्य देईन.”
करारामध्ये सलमान खान यांच्याविरोधात बोलण्याची अट
सोनूने पुढे स्पष्ट केले की, त्यानं ‘काला हिरण’चे दोन दिवस शूटिंग केले होते. मात्र, अधिकृत करार करण्यापूर्वीच चित्रपटातून बाहेर पडण्याचा त्यानं निर्णय घेतला. तो म्हणाला, “दोन दिवसांच्या शूटिंगनंतर निर्मात्यांकडे चित्रपटाची स्क्रिप्ट मागितली. मुख्य अभिनेता म्हणून कथा आणि करारातील अटी जाणून घ्यायच्या होत्या. बराच वेळ टाळाटाळ केल्यानंतर त्यांनी मला करार दाखवला. त्यामध्ये माध्यमांसमोर सलमान खान यांच्याविरोधात बोलण्याची अटही होती. या गोष्टी माझ्या तत्त्वांशी जुळणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे मी या प्रकल्पापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सोनू मिश्राने स्पष्टपणे सांगितले.
