उर्मिला मातोंडकर ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी चित्रपटांसह तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांतील चित्रपटांतही काम केलं आहे. उर्मिला मातोंडकर ५२ वर्षांची आहे. अनेक सुपरहिट बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणारी उर्मिला अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली. उर्मिलाचं करिअर, चित्रपट, वैयक्तिक आयुष्य याबद्दल जाणून घेऊयात.
उर्मिलाचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत झाला. तिला बालपणापासून अभिनयाची आवड होती. उर्मिलाने आपल्या अभिनयाची सुरुवात ‘कलयुग’ (१९८०) या चित्रपटातून बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर ‘मासूम’ (१९८३) चित्रपटातील तिच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. १९९१ मध्ये ‘नरसिंहा’ चित्रपटातून प्रमुख अभिनेत्री म्हणून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले. मात्र, खऱ्या अर्थाने तिला १९९५ मध्ये आलेल्या ‘रंगीला’ या चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटाने तिचे नशीब पूर्णपणे बदलले. अनेक मोठ्या स्टार्सबरोबर तिने काम केलं. तिने तिचा डान्स आणि अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. या चित्रपटानंतर, ती ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘रंगीला’ ने अनेक पुरस्कार जिंकले आणि उर्मिलाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
राम गोपाल वर्मा व उर्मिला मातोंडकरचं नातं
उर्मिला मातोंडकरचं नाव दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याशी जोडलं गेलं होतं. राम गोपाल वर्मांच्या एक्स पत्नी रत्ना वर्माने उर्मिलाला कानाखाली लगावली होती, असं म्हटलं जातं. बॉलीवूड शादीच्या वृत्तानुसार, राम गोपाल वर्मा यांनी रंगीला चित्रपटात उर्मिलाला घेतल्यावर त्यांच्यात जवळीक वाढल्याच्या अफवा पसरल्या. याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर झाला. रत्ना सेटवर आली आणि तिचं उर्मिलाशी जोरदार भांडण झालं, नंतर तिने त्याच्या कानाखाली मारली.
हिरोपेक्षा जास्त मानधन घ्यायची उर्मिला
उर्मिलाने करिअरमध्ये ‘सत्या’, ‘कौन’, ‘मस्त’, ‘दौड’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. तिने गंभीर व सशक्त भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. उर्मिलाला इतकं यश मिळालं की ती हिरोंपेक्षा जास्त मानधन घ्यायची. पण यशाच्या शिखरावर असताना उर्मिला इंडस्ट्रीपासून दूर गेली. काम मिळत असूनही मानसिक शांतीसाठी आपण अभिनयापासून दुरावल्याचं उर्मिलाने म्हटलं होतं. उर्मिला मातोंडकर ६८ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
उर्मिला मातोंडकरचं लग्न व घटस्फोट
चित्रपटांपासून दूर गेल्यावर उर्मिलाने २०१६ मध्ये हिंदू पद्धतीने काश्मिरी उद्योगपती मोहसीन अख्तर मीरशी लग्न केलं. तिच्या मुंबईतील घरी तिने साधेपणाने हिंदू पद्धतीने मोहसीनशी लग्न केलं होतं. तिचा नवरा तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान होता. उर्मिलाचा जन्म १९७४ मध्ये झाला आणि मोहसीनचा जन्म १९८४ मध्ये झाला होता. पण लग्नाच्या ८ वर्षांनंतर २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता उर्मिला एकटी राहतेय.
या लग्नापासून उर्मिलाला अपत्ये नाही. पण आपल्याला मुलं आवडतात, असं तिने म्हटलं होतं. “मला मुलं आवडतात पण अशी अनेक मुले आहेत ज्यांना प्रेम आणि काळजीची आवश्यकता असते. त्यांना तुम्हीच जन्म दिला असावा, हे गरजेचं नाही,” असं उर्मिला मातोंडकरने ‘ईटाइम्स’शी बोलताना म्हटलं होतं.

