Urmila Matondkar Ex Husband Mohsin Akhtar Marries Nidha Bhatt: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. आता तिचा माजी पती मोहसीन अख्तरने उर्मिलासोबतच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी दुसरं लग्न केलं आहे. त्याने स्वतः इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या निकाहाचे सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
मोहसीन अख्तरच्या दुसऱ्या पत्नीचे नाव निधा भट्ट आहे. मोहसीनने निधाबरोबरच्या निकाहाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघांनी ट्विनिंग केलेलं फोटोमध्ये पाहायला मिळतंय. मोहसीनने फोटोंबरोबर एक मोठं कॅप्शनही लिहिलं आहे, ज्यात त्याने निधाचे आभारही मानले आहेत.
“शुद्ध हेतू, प्रामाणिक प्रेम आणि संयम अन् कृतज्ञतेने भरलेलं हृदय. तुमचा आत्मा नेहमी पवित्र ठेवा, वेळेबरोबर स्वतःला सावरत राहा आणि अल्लाहने तुमच्यासाठी सर्वोत्तम लिहिलं असेल यावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर अल्लाहने मला माझ्या सुंदर पत्नीच्या रूपाने प्रामाणिकपणाचे फळ दिले आणि मला आशीर्वाद दिले. तू माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास. त्यामुळे मनापासून थँक्यू निधा!
आणि आई तू जिथे आहेस तिथून माझ्यावर लक्ष ठेवलंस, त्याबद्दल तुझे आभार. मला माहीत आहे की हा तुझाच आशीर्वाद आणि माझ्यावरील प्रेम आहे, जे या रूपाने माझ्यापर्यंत पोहोचले आहे. आज तुला खूप समाधान मिळालं असेल याची मला खात्री आहे. मला तुझी खूप आठवण येते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,” अशी पोस्ट मोहसीन अख्तरने केली आहे.
पाहा मोहसीन अख्तरच्या लग्नाची पोस्ट
मोहसीन अख्तर व निधा भट्ट यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. दोघांनाही त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.
मोहसीन अख्तर व उर्मिला मातोंडकरचं लग्न आणि घटस्फोट
उर्मिला व मोहसीन दोघेही फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात २०१४ मध्ये भेटले होते. तिथे मोहसीनला उर्मिला आवडली. नंतर भेटीगाठी वाढल्या आणि त्यांनी २०१६ मध्ये लग्न केलं. उर्मिलापेक्षा मोहसीन १० वर्षांनी लहान होता. ८ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर मोहसीन व उर्मिला यांनी २०२४ मध्ये घटस्फोट घेतला.
मोहसीन अख्तर कोण आहे?
४२ वर्षांचा मोहसीन अख्तर मीर हा मुळचा काश्मीरचा आहे. तो अभिनेता व्हायला मुंबईत आला होता. २००७ मध्ये मिस्टर इंडिया स्पर्धेत तो सेकंड रनर-अप राहिला होता. मोहसीनने २००९ मध्ये ‘इट्स अ मॅन्स वर्ल्ड’ चित्रपटातून पदार्पण केले, नंतर त्याने त्याच वर्षी ‘लक बाय चान्स’ मध्ये काम केलं होतं. मग तो ‘मुंबई मस्त कलंदर’ मध्ये झळकला. त्याने ‘बी.ए. पास’ चित्रपटातही काम केलं होतं. इतके चित्रपट करूनही त्याला फारसं यश आणि प्रसिद्धी मिळाली नाही, मग त्याने व्यवसाय करायचं ठरवलं. मोहसीनने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राबरोबर काम करतो. मोहसीन उद्योजक आहे, त्याचा काश्मिरी भरतकामाचा व्यवसाय आहे.
