Urmila Matondkar ex Husband Mohsin Akhtar : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिचा एक्स पती मोहसीन अख्तर यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. अभिनेत्रीपासून वेगळं झाल्यानंतर मोहसीन अख्तरने त्याच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर मोहसीनने निधा भट्ट हिच्याबरोबर निकाह केला. यापूर्वी त्याने निकाहचे फोटो शेअर केले होता. आता मोहसीन अख्तरने त्याचे रिसेप्शनमधील खास फोटो शेअर केले असून त्याच्या पत्नीबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
मोहसीन अख्तरने इन्स्टाग्रामवर रिसेप्शनमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मोहसीन आणि निधा दोघांनीही गुलाबी रंगाचे स्टायलिश आऊटफिट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या मोहसीनने आता पत्नी निधासाठी खास भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या आयुष्यातील निधाचे असलेले महत्त्व आणि प्रेम मोहसीनने सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.
काय आहे मोहसीन अख्तरची पोस्ट?
मोहसीन कॅप्शनमध्ये लिहिलं, “तू फक्त माझी पत्नी झाली नाहीस तर, माझं घर, माझी शांतता आणि प्रत्येक दिवसाला सुंदर बनवणारी माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती झालीस. तू माझ्या आयुष्यामध्ये आल्याबद्दल मी परमेश्वराचा कायम ऋणी राहीन. आयुष्यभर मी तुझी काळजी घेईन, तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि असाच तुझ्यावर प्रेम करीत राहीन, असं मी तुला वचन देतो. आपल्या नात्यासाठी आणि सुंदर आयुष्यासाठी असंच एकमेकांबरोबर उभं राहू, माझ्यावर केलेल्या या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद, तू माझ्या आयुष्यात आहेस, यासाठी मी कायम कृतज्ञ राहीन.”
मोहसीन अख्तरच्या पत्नी निधा भट्टसह शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांच्या प्रेमाला आणि वैवाहिक आयुष्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये त्यांनी ट्विनिंग केल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर उर्मिला मातोंडकरच्या एक्स पतीच्या या लग्नाचे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
उर्मिला मातोंडकर व मोहसीन अख्तरचा घटस्फोट
दरम्यान, उर्मिला मातोंडकर व मोहसीन यांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. त्या दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर होते. उर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान असलेला मोहसीन हा मूळचा काश्मीरचा असून तो मुंबईमध्ये अभिनेता होण्यासाठी आला होता. २०१४मध्ये मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात त्याची उर्मिला मातोंडकरबरोबर ओळख झाली. यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले होते. २०१६ मध्ये त्यांनी विवाह केला पण त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. ८ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर मोहसीन व उर्मिला यांनी २०२४ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर मोहसीनने दुसऱ्यांदा निधा भट्टबरोबर निकाह केला आहे.
