Urmila Matondkar net worth: ‘जुदाई’, ‘मासूम’, ‘इंडियन’, ‘रंगीला’ अशा एकापेक्षा एक चित्रपटांतून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने प्रेक्षकांच्या मनावर रा्ज्य केले आहे. तिला रंगीला गर्ल म्हणूनही ओळखले जाते. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या नरसिंह या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसली होती. काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या एक्स पतीने दुसरे लग्न केल्याने अभिनेत्री मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. आता या सगळ्यात अभिनेत्रीच्या संपत्तीची चर्चा होत आहे.

मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर कसे आयुष्य जगते, तिची जीवनशैली कशी आहे, याबद्दल जाणून घेऊ…

अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती?

‘कोइमोई’च्या रिपोर्टनुसार, ऊर्मिलाची एकूण संपत्ती ६८.२८ कोटी इतकी आहे. तिने तिच्या २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात तिच्या मालमत्तेचा खुलासा केला होता. तिच्याकडे १.२७ कोटींचे हिऱ्यांचे दागिने आहेत. १.४८ लाखांची सोन्याची नाणी आहेत; तर १७.६५ कोटींचे सोन्याचे दागिने आहेत. याबरोबरच तिच्या मालकीची शेतजमीनही आहे. त्याची किंमत सुमारे ६० लाख इतकी आहे. तसेच तिच्या पीएफ खात्यात ६२ लाख आहेत. तसेच, बँकेत ५१ लाखांहून अधिक रुपयांची ठेव आहे. तसेच, तिने शेअर्स, बॉण्ड्स व म्युच्युअल फंड यांमध्ये ३४ कोटींची गुंतवणूक केली आहे. याबरोबरच तिच्याकडे अलिशान मर्सिडीज आहे. महत्त्वाचे म्हणजे तिच्यावर कोणतेही कर्ज नाही.

ऊर्मिलाचे यापूर्वी २०१६ मध्ये मोहसिन अख्तर मीर याच्याशी लग्न झाले होते. २०२४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मोहसिनने दुसरे लग्न केले आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करीत असते. ती तिच्या फिटनेसबाबत जागरूक आहे. तिचे ग्लॅमरस लूक्स अनेकदा व्हायरल होतात.

ऊर्मिलाने २०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसची उमेदवार म्हणून लढवली; पण तिचा पराभव झाला. २०२० मध्ये तिने काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती २०१८ मध्ये ‘ब्लॅकमेल’ चित्रपटात दिसली होती. त्याबरोबरच ती टीव्हीवरील रिॲलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम करते. २०२२ मध्ये तिने ‘डीआयडी सुपर मॉम्स’ या शोमध्ये जज म्हणून काम केले.