Urmila Matondkar on quit Bollywood: ऊर्मिला मातोंडकर ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुदाई, मासुम, इंडियन, रंगीला अशा एकापेक्षा एक चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
मात्र, काही काळापासून ऊर्मिला बॉलीवूडपासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे. पाच वर्षांपासून अधिक काळ ती कोणत्याही चित्रपटात भूमिका साकारताना दिसलेली नाही. त्यामुळे तिने बॉलीवूड सोडले का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केले आहे.
ऊर्मिला मातोंडकर म्हणाली…
ऊर्मिला मातोंडकरने नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी कायमच निवडक भूमिका साकारल्या आहेत. जर काही जण असा विचार करीत असतील की, मी सध्या अभिनय क्षेत्रात किंवा कोणत्याही चित्रपटात काम करत नाही, तर त्यांना मी दोष देऊ शकत नाही. मात्र, मी अभिनय सोडलेला नाही. रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी मी आता पूर्णपणे तयार आहे.”
पुढे ती असेही म्हणाली, “मी अशा भूमिका शोधत आहे, ज्या मी यापूर्वी साकारलेल्या नाहीत. विशेषतः ओटीटीवर काम करण्यास मी उत्सुक आहे. कारण- ओटीटीवर अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी येत आहेत. पात्रे, भावना ज्या पद्धतीने दाखवल्या जातात, ते नवीन आहे. त्यामुळे अनेक प्रयोग करायला मिळतात. एक वेगळाच मार्ग खुला झाला आहे. याआधी असे घडत नव्हते.”
ऊर्मिला असेही म्हणाली, “मी नुकतेच एका शोचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा शो पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. मला असे काहीतरी हवे आहे, जे एक कलाकार म्हणून आव्हानात्मक असेल. मी नक्कीच काहीतरी नवीन गोष्टी करून बघत आहे. चित्रपटाच्या सेटवर परतण्याची आणि पुन्हा धमाल करण्याची वेळ आली आहे.”
कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना ऊर्मिला म्हणते, “माझ्या कारकिर्दीत मी केलेली सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे मी कधीही एकसारख्या भूमिका साकारलेल्या नाहीत. माझे अनेक समकालीन कलाकार होते, जे एकाच प्रकारच्या भूमिका करीत होते, एकाच प्रकारचे कपडे घालत होते. मी तुलनेने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.”
मानधनाबद्दल ऊर्मिला म्हणाली की, १९९० च्या तुलनेत सध्या मानधनात चांगले बदल झाले आहेत. पण असे असले तरीही मला आधीपासून चांगले मानधन मिळत असल्याने माझ्याकडे तक्रार करण्यासारखे फार काही नाही. “मला जे मानधन दिले जात होते, त्याबद्दल मला कोणतीही अडचण नाही. मी त्यावेळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक होते. अनेकदा मला माझ्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा जास्त पैसे दिले गेले आहेत. म्हणून मला वाटते की, स्त्रीआणि पुरुष कलाकारांच्या मानधनात असमानता असते. त्याकडे एकाच दृष्टिकोनातून पाहिले नाही पाहिजे.”
ती पुढे म्हणाली, “परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांत खूपच चांगले मानधन दिले जात आहे; परंतु चित्रपटांचे बजेटही तसेच आहे. म्हणून फक्त एकाच दृष्टिकोनातून उत्तर देणे योग्य ठरणार नाही. गेल्या तीन दशकांत सर्व काही मोठ्या प्रमाणात बदलले आहे. मानधन आणि इतर सर्व गोष्टीदेखील त्यानुसार बदलल्या आहेत.”
दरम्यान, ऊर्मिलाने १९९१ ला प्रदर्शित झालेल्या नरसिंह या चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले होते.
