Urmila Matondkar Ram Gopal Varma Secret Marriage: बॉलीवूडमध्ये अफेअर असणं आणि त्यावर चर्चा रंगणं हे काही नवीन नाही. अनेक कलाकारांच्या नात्यांची आणि त्यांच्या लग्नांची चर्चा रंगत असते. कधी कधी ही नाती यशस्वी होतात, तर अनेकदा त्यांचे ब्रेकअप होत असतात. पण, या कलाकारांचे किस्से आणि त्यांच्या प्रेमाच्या आठवणी अनेक वर्ष चर्चेमध्ये राहत असतात. असेच सिनेविश्वातील एक चर्चेत राहिलेले अफेअर म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा. या दोघांच्या अफेअरची चर्चा त्यावेळी सिनेविश्वामध्ये जोरदार रंगली होती. आता पुन्हा एकदा हे दोघे चर्चेमध्ये आले आहेत. या दोघांचे फक्त अफेअर नव्हतं तर त्यांनी लग्नसुद्धा केल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ऊर्मिला व राम गोपाल वर्मा हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी सिनेविश्वातील किस्से आणि अनुभव सांगितले आहेत. यावेळी त्यांना असे कोणते कलाकार आहेत ज्यांनी लग्न केलं का नाही याबद्दल अजूनही चाहत्यांना माहीत नाही, असे विचारले असता, यावेळी ज्योती व्यंकटेश म्हणाले, “खरं तर बॉलीवूडमध्ये असे एक-दोन नाही तर खूप कलाकार आहेत, अशा अनेक बातम्या माझ्याकडे येत होत्या. त्यातील किती खरं आणि किती खोटं हे मला आता सांगता येत नाही. पण, ऊर्मिला मातोंडकरचा एक किस्सा माझ्या लक्षात आहे. त्यावेळी ती राम गोपाल वर्माबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. यावर दोघांच्याही बाजूने खूप आक्षेप आहेत.”
राम गोपाल वर्माने ऊर्मिला मातोंडकरसह केलं होतं लग्न?
पुढे ते म्हणाले, “एकदा मी उटीमध्ये शूटिंगसाठी गेलो होतो, त्यावेळी ‘जेंटलमन’ या सिनेमातील अभिनेता चिरंजीवी माझ्याबरोबर बोलत होता. त्यावेळी आमच्या गप्पा रंगल्या होत्या आणि त्याने अचानक बोलताना ऊर्मिला व राम गोपाल यांच्या लग्नाचा विषय काढला. तो अभिनेता मला म्हणाला, ‘ज्योती, तू एवढ्या विषयांवर लिहीत असतोस; पण आतापर्यंत राम गोपाल वर्मानं ऊर्मिला मातोंडकरशी लग्न केल्याबद्दल काहीच लिहिलं नाहीस,’ त्यावर मी त्याला विचारलं, काय सांगतोस आणि हे लग्न कधी झालं?'”
ज्योती व्यंकटेश पुढे म्हणाले, “मी चिरंजीवीला सांगितलं की, त्यांचं अफेअर आहे, हे मला माहीत आहे; पण लग्न कधी झालं हे मला माहीत नाही. यावर चिरंजीवी म्हणाला, ‘हो त्यांचं लग्न झालं आहे. त्यावेळी आंध्र प्रदेशमधील एक खास देवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी ऊर्मिलाला घेऊन जाऊन त्यांनी देवाच्या समोर लग्न केलं होतं,’ असं चिरंजीवीनं सांगितलं. यावर मी म्हणालो, माझा यावर विश्वास नाही, असं तर कोणीही सांगू शकतं. यावर चिरंजीवी म्हणाला होता, ‘अरे मी सांगतोय ना तुला.”
ऊर्मिला फोनवर रडायला लागली अन्…
पुढे ज्योती व्यंकटेश यांनी सांगितलं की, “ही बातमी प्रकाशित करण्यापूर्वी त्यांनी स्वतः ऊर्मिला मातोंडकरशी संपर्क साधून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत ऊर्मिलाला विचारल्यानंतर ती रडून म्हणाली, ‘तुम्ही माझ्याबद्दल असं कसं लिहू शकता? मी इंडस्ट्रीत आल्यापासून तुम्ही मला ओळखता.’ आणि या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी स्पष्ट नकार दिल्याचंही ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेशने सांगितलं.
राम गोपाल वर्मा व ऊर्मिला मातोंडकर यांचं एकत्र काम
राम गोपाल वर्मा यांनी ‘शिवा’ या दाक्षिणात्य चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, त्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आणि ‘रंगीला’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला. यामध्ये अभिनेता आमिर खान व उर्मिला मातोंडकर हे मुख्य भूमिकांमध्ये होते. यानंतर राम गोपाल वर्मा व ऊर्मिला मातोंडकर यांनी एकत्र काम करत अनेक हिट चित्रपट दिले, ज्यामध्ये ‘दौड’, ‘सत्या’ आणि ‘प्यार तूने क्या किया’ या चित्रपटांचा समावेश आहे. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगल्या होत्या.
