Uzbekistan School Kids Dancing on Bollywood Songs: उझबेकिस्तानमध्ये बॉलीवूड आणि भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तिथले तरुण आणि मुलं अनेकदा भारतीय गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या उझबेकिस्तानमधील शाळकरी मुलांचे बॉलीवूड गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नुकतेच इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये उझबेकिस्तानमधील एका शाळेतील लहान मुलं आणि मुली पारंपरिक भारतीय वेशभूषेत म्हणजेच साडी आणि कुर्त्यात बॉलीवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर अतिशय उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. ही मुलं ‘उडे जब जब जुल्फें तेरी’, ‘मुझको राना जी माफ करना’ अशा जुन्या गाण्यांवर डान्स करताना दिसत आहेत.
या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांवरील त्यांचे डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून भारतीय युजर्स थक्क झाले आहेत.
पाहा मुलांचे व्हायरल व्हिडीओ
‘किती सुंदर’, ‘या मुलांचे एक्सप्रेशन किती गोड’, ‘कोणी या मुलांच्या प्रेमात का पडू नये?’ ‘किती निरागस हावभाव’, ‘ते किती अभिमानाने डान्स करतायत’, ‘यांचा डान्स पाहून खूप मज्जा आली’, ‘जुनं ते सोनं’, ‘भारतातील लोकांकडून या मुलांना खूप प्रेम,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
उझबेकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट आणि गाण्यांना खूप जुना इतिहास आहे. तिथे राज कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि शाहरुख खान यांचे प्रचंड चाहते आहेत. तिथल्या मुलांना हिंदी भाषा पूर्णपणे समजत नसली तरी, ते हिंदी गाणी सहज गातात आणि बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स करतात. उझबेकिस्तानच्या शाळांमध्ये अनेकदा ‘भारतीय सांस्कृतिक दिवस’ साजरा केला जातो, जिथे मुले भारतीय गाणी गातात आणि डान्स करतात.
उझबेकिस्तानमधील अनेक टीव्ही चॅनेलवर भारतीय चित्रपट आणि मालिका डब करून दाखवल्या जातात. आता केवळ बॉलीवूडच नाही, तर ‘पुष्पा’ (अल्लू अर्जुन) आणि ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ यांसारखी दाक्षिणात्य गाणीही तिथे व्हायरल होत आहेत. उझबेक सरकारने अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांना तिथल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी खास आमंत्रित केले होते. उझबेकिस्तान सरकार भारतीय चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या देशात चित्रीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
