रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२६ रोजी, दिवाळीच्या दोन दिवस आधी, चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच भारतीय प्रेक्षकांना रामायणावर आधारित आणखी एक चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘वाल्मीकि रामायण’ असून, तो रणबीर कपूरच्या ‘रामायण’पूर्वी प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शिका भावना तलवार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘वाल्मीकि रामायण’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, हा चित्रपट महर्षी वाल्मीकी यांच्या मूळ रामायणावर आधारित असून, त्यातील कथा प्रामाणिक, साध्या आणि प्रभावी पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘बाहुबली’च्या लेखकाने लिहिली आहे कथा
दिग्दर्शिका भावना तलवार यांच्या ‘वाल्मीकि रामायण’ या हिंदी पौराणिक चित्रपटाची कथा ‘बाहुबली’चे लेखक आनंद नीलकांतन यांनी लिहिली आहे. तर चित्रपटाचे संवाद डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लिहिले आहेत. याशिवाय चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अधिक भव्य आणि दर्जेदार करण्यासाठी प्रसिद्ध छायाचित्रकार बिनोद प्रधान आणि ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुकुट्टी यांचीही टीममध्ये निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण भारतातच करण्यात आलं आहे.
बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर
‘वाल्मीकि रामायण’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम ३’शी टक्कर होणार आहे. तर दुसरीकडे, रणबीर कपूरच्या ‘रामायण’समोर हॉलीवूडचा बिग-बजेट चित्रपट ‘गॉडझिला मायनस झिरो’चं आव्हान असणार आहे.
दरम्यान, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘रामायण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मोठ्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला असून, अनेक दिग्गज कलाकारांचीही फौज यात झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेतील आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
