Varun Dhawan Daughter Health News : बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार अलीकडे लग्नबंधनात अडकले, तर अनेक जण आई-बाबा झाले. यापैकीच एक नाव म्हणजे लोकप्रिय अभिनेता वरुण धवन. वरुण त्याच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अशातच आता त्यानं त्याच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.
वरुणनं काही वर्षांपू्र्वी त्याची गर्लफ्रेंड नताशाबरोबर लग्न केलेलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर २०२४ मध्ये वरुणच्या लेकीचा लाराचा जन्म झाला. अशातच आता एका मुलाखतीत त्यानं त्याच्या लेकीच्या जन्माबद्दल आणि पत्नीबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यानं त्याच्या लेकीला जन्मानंतर काही अडचणींना सामोरं जावं लागल्याचं म्हटलं आहे.
वरुणच्या लेकीला जन्मानंतर गंभीर आजाराचं झालेलं निदान
Be A Man, Yaar! च्या एका भागात वरुण धवननं सांगितलं की, त्याच्या मुलीला DDH (Developmental Dysplasia of the Hip) हा आजार झाला होता, त्यामुळे तिला नीट चालता किंवा धावता येत नव्हतं. त्यानं पुढे सांगितलं की, तिच्यावर उपचार करण्यात आले असून आता ती हळूहळू त्यातून सावरत आहे.
वरुण धवननं सांगितलं की, त्याची मुलगी लारा दीड वर्षांची असताना तिला DDH (Developmental Dysplasia of the Hip) या आजाराचं निदान झालं.त्यानं स्पष्ट केलं की, या आजारात कंबरेजवळचा सांधा (हिप) जागेवरून सरकतो, त्यामुळे एक पाय दुसऱ्यापेक्षा लहान वाटू लागतो आणि चालताना चाल वाकडी होते, यामुळे नीट चालता किंवा धावता येत नाही.
वरुण धवन पुढे म्हणाला, “या आजारामुळे लवकर आर्थ्रायटिस किंवा स्लिप डिस्क होण्याची शक्यता असते. पाश्चिमात्य देशांमध्ये यावर जन्मापासूनच खूप चांगला उपचार केला जातो. भारतात अजून सर्वत्र तशी सुविधा नाही. पण, इथेही अनेक चांगले डॉक्टर आहेत जे याची योग्य काळजी घेतात. तिला शस्त्रक्रियेची गरज पडली नाही. एका प्रक्रियेमुळे डॉक्टरांनी तिचा हिप पुन्हा योग्य जागी बसवला. मात्र, तिला ‘स्पायका कास्ट’(Spica cast)मध्ये ठेवावं लागलं. म्हणजेच तिला सुमारे अडीच महिने प्लास्टरमध्ये राहावं लागलं, जे खूप कठीण होतं. तिला भूल देऊन कास्ट लावण्यात आला आणि ती उठली तेव्हा ती पूर्ण प्लास्टरमध्ये होती. आता तिचं प्लास्टर काढण्यात आलं आहे. या अनुभवावर मला एक पुस्तक लिहावंसं वाटतं.”
