Varun Dhawan on Ranveer Singh and Ranbir Kapoor: करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्ये, सांगितलेले किस्से तसेच विविध गोष्टींबाबतचे त्यांचे दृष्टीकोण अशा अनेक गोष्टींमुळे या कलाकारांची चर्चा होते. वरूण धवनने नुकतीच ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.

रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांच्यापैकी वरुण धवनने कोणाला निवडले?

या शोमध्ये करणने वरुणला रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांच्यातील एकाला निवडायला सांगितले. करण जोहरने वरुणला विचारले की, ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंगने साकारलेली हमजा ही भूमिका आणि ‘ॲनिमल’मधील रणबीर कपूरने साकारलेली रणविजय सिंग ही भूमिका यामध्ये अधिक प्रभावी कोणती भूमिका होती? यावर वरुणने रणवीर सिंहची धुरंधर भूमिका अधिक प्रभावी असल्याचे सांगितले.

वरूण धवन म्हणाला, “मी धुरंधर मधील रणवीर सिंहला निवडेन.” पुढे त्याने त्याच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण सांगितली. तसे वक्तव्य करणे चुकीचे होते, असेही तो म्हणाला.

वरूण धवन २०१८ मध्ये कॉफी विथ करणच्या सहाव्या पर्वात आला होता. त्यावेळी करण जोहरने त्याला विचारले की तो रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोघांपैकी कोणाबरोबर त्याला त्याच्या करिअरची अदलाबदल करायला आवडेल? त्यावर वरूण धवन दोघांपैकी कोणाबरोबरही नाही, असं म्हणाला होता. तसेच, तो असेही म्हणाला होता की माझे सलग आठ सिनेमे हिट ठरले आहेत.

आता २०२६ मध्ये कॉफी विथ करणमध्ये तो म्हणाला की त्यावेळी तसे वक्तव्य करायला नको होते. त्याचा माझ्या करिअरवर नकारात्मक परिणाम झाला. सिनेमे आता पहिल्यासारखे हिट होत नाहीत. मला लक्षात आलं आहे की आपल्या यशाचा दिखावा करण्यापेक्षा कामावर लक्ष दिलं पाहिजे.