Varun Dhawan Video : पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेक कलाकार वेगवेगळे आउटफिट करून हटके अंदाजात हजेरी लावत असतात. कामाव्यतिरिक्त भेटण्याचं हे एक निमित्त ठरतं, त्यामुळे अनेक सहकलाकारांशी त्यांना संवाद साधता येतो. अनेक गमती जमती घडतात. अनेक कलाकार तर वेगवेगळे परफॉर्मन्सही सादर करतात.
पुरस्कार सोहळ्यांमधील कलाकारांचे परफॉर्मन्स अनेकदा चर्चेचा विषय ठरतात, कारण त्यावेळी अनेक गमती जमती, किस्से होत असतात. असंच काहीसं झालेलं २०१६ मध्ये पार पडलेल्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यादरम्यान. त्यावेळी बॉलीवूड अभिनेता वरुण धवननं त्याच्या परफॉर्मन्सनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं आणि त्याच्या या डान्सची खूप चर्चा झाली होती. पुरस्कार सोहळ्यात कलाकार देशभक्तिपर गाणी, प्रेमाची गाणी अशा विविध गाण्यांवर डान्स करतात. वरुणनंसुद्धा देशभक्तिपर गाण्यावर डान्स केलेला, ज्यामुळे कार्यक्रमात वेगळीच रंगत आलेली.
वरुण धवन नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. काहीवेळा अभिनेता ट्रोलही होत असतो. परंतु, त्याचे चाहते त्याच्या कामाचं कौतुकही करतात. एकदा २०१६ मध्ये पार पडलेल्या स्क्रीन अवॉर्डसमध्ये त्यानं देशभक्तिपर गाण्यावर सादरीकरण केलं होतं, त्यावेळी त्यानं आधी ‘जी करदा’, त्यानंतर ‘टुकुर टुकुर’ या गाण्यांवर नृत्य केलं. पण, नंतर “वंदे मातरम्” या गाण्यावर स्टंटने भरलेला दमदार परफॉर्मन्स सादर केला. त्यानंतर त्यानं माइक हातात घेत सांगितलं की, भारतीय सैन्याला खास आदरांजली वाहण्यासाठी त्यानं शेवटच्या क्षणी अचानक हा नृत्यपर परफॉर्मन्स करण्याचा निर्णय घेतला.
वरुणनं ‘सुनो गौर से दुनिया वालो’ या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. अभिनेत्यानं आपल्या सादरीकरणात भव्य एरियल सिक्वेन्स समाविष्ट करून परफॉर्मन्स आणखी दमदार केला. जमिनीवरील कोरिओग्राफी आणि हवेतल्या स्टेप्स यामध्ये त्यांनी सहजपणे बदल करत प्रेक्षकांची दाद मिळवली.
शेकडो चाहते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यांत हा क्षण कैद करताना दिसले. संपूर्ण ऑडिटोरियम टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले, तर अनेक कलाकार उभे राहून स्टँडिंग ओव्हेशन देताना दिसले. रेखा, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे कलाकारही अभिमानानं भारावलेले दिसत होते आणि या अप्रतिम सादरीकरणाच्या शेवटी त्यांनी उत्साहाने टाळ्या वाजवत कौतुक केलं. त्यावेळी कठीण स्टंट सहजपणे करणाऱ्या अक्षय कुमारनंही वरुणचं कौतुक केलेलं.
