Varun Dhawan rejected Andhadhun offer : बॉलीवूड अभिनेता वरुण धवन याचा ‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपट प्रदर्शित झाला होता; मात्र बॉक्स ऑफिसवर तो कमाल दाखवू शकला नाही. वरुणच्या चित्रपटांना प्रेक्षकांची साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. वरुणने काही हिट चित्रपट दिले असले तरी त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. मात्र त्याने अशा एका चित्रपटाला नकार दिला, जो चित्रपट पुढे प्रचंड हिट ठरला आणि त्या चित्रपटाने मुख्य अभिनेत्याला स्टार बनवले. कंगना रणौत प्रमुख भूमिकेमध्ये असलेल्या या चित्रपटाला वरुण धवनने नकार दिल्याचा खुलासा केला गेला आहे.
वरुण धवनने तन्मय भट्टच्या यूट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्री कंगना रणौतसह एका चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिल्याचा खुलासा केला. वरुण धवनने चित्रपट करण्यासाठी नकार दिला असला तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचे अमाप प्रेम आणि बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळाले. कंगना रणौत असलेल्या या चित्रपटामध्ये वरुणने काम करण्यास नकार दिला असला तरी नंतर कंगना रणौतसुद्धा या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्या. तो चित्रपट म्हणजे ‘अंधाधुन’.
आयुष्मानच्या कारकिर्दीतील ठरला सुपरहिट चित्रपट
श्रीराम राघवन यांचा ‘अंधाधुन’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. अगदी या चित्रपटाचा तेलुगू रिमेकदेखील करण्यात आला होता. त्यामध्ये आयुष्मान खुराना, राधिका आपटे व तब्बू या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या. या चित्रपटातून आयुष्मान खुरानाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आयुष्मानच्या कारकिर्दीसाठी हा चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरला. पण, वरुणने सुरुवातीला हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.
वरुण धवनने का दिला दिला होता नकार?
‘अंधाधुन’ चित्रपटाची ऑफर नाकारल्याचे सांगताना वरुण धवन म्हणाला, “मला वाटतं मी ‘अंधाधुन’ या एका चांगल्या चित्रपटाला नकार दिला होता, जो नंतर एक खूप हिट चित्रपट ठरला. पण त्यावेळी मी दुसऱ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो आणि त्यामुळे मी तो करू शकलो नाही. त्या चित्रपटाच्या मूळ कलाकारांमध्ये मी आणि कंगना रणौत होतो, असा खुलासा वरुण धवनने केला आहे. त्यामुळे कंगना रणौत असलेल्या चित्रपटाला वरुण धवनने नकार दिल्यामुळे आणखी एक हिट चित्रपट हातातून गेल्याचे समोर आले. ‘अंधाधुन’ चित्रपटाने ४०० करोडहून अधिक रुपयांची कमाई केली होती.
बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींहून अधिक कमाई
श्रीराम राघवनने दिग्दर्शित केलेला ‘अंधाधुन’ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची हटके गोष्ट आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींहून अधिक कमाई केली. त्यामध्ये आकाश नावाच्या पियानोवादकाची कथा असून, तो आंधळा असण्याचे नाटक करीत असतो. फसवणूक, ब्लॅक कॉमेडी व धक्कादायक वळणांनी भरलेल्या एका खून-रहस्यात अडकतो. आयुष्मान खुरानाने अभिनयातून निरागसता, विनोद, हळवेपणा आणि रहस्य यांचा अचूक समतोल साधत सर्वोत्तम अभिनय सादर केला.
