Varun Dhawan on Salman Khan: विविध मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमांतून कलाकार अनेकदा व्यक्त होताना दिसतात. अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल ते काही गोष्टी चाहत्यांना सांगतात. काही कलाकृती आवडल्या असतील, तर त्याबद्दलही ते मोकळेपणाने बोलतात. अनेकदा इंडस्ट्रीतील इतर कलाकारांबद्दल ते व्यक्त होताना दिसतात.
आता अभिनेता वरुण धवनने एका मुलाखतीत सलमान खानबद्दल केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. बॉर्डर २ हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. त्याआधी चित्रपटातील काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्या गाण्यातील वरुण धवनचा अभिनय पाहून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
“त्यांचा विश्वास आणि त्यांचा सल्ला…”
जेव्हा वरुण धवनला ट्रोल करण्यात येत होते, त्यावेळी सलमान खानने काय केले होते, याबद्दल अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केले . तो म्हणाला, “ज्यावेळी तुमच्याबरोबर अशा गोष्टी घडतात, त्या परिस्थितीत जी माणसं तुमच्याबरोबर उभी असतात, ती महत्त्वाची असतात. सलमानजींनी मला रात्री फोन केला. ते हसले आणि मला म्हणाले की, भविष्यात चांगल्या गोष्टी घडतील. त्यांचा विश्वास आणि त्यांचा सल्ला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
तो पुढे असेही म्हणाला, “जेव्हा ‘बॉर्डर २’ सिनेमा प्रदर्शित झाला. चित्रपटानं उत्तम कमाई केली, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तेव्हा त्यांनी पुन्हा मला फोन केला. रात्रीच्या दोन वाजता त्यांनी मला फोन केला होता. ते मला म्हणाले की, मी तुमच्या सगळ्यांसाठी खूप खूश आहे. ते पुढे मला म्हणाले की, मला तुझा अभिमान आहे. त्यांचे ते शब्द ऐकल्यानंतर मी बेडवर उठून उभा राहिलो होतो. ते शब्द कायम माझ्या मनात राहतील. खरं तर त्यांना माझं कौतुक करण्याची गरज नाही; पण त्यांनी ते केलं. त्यांच्या शब्दांनी मला आत्मविश्वास आला”, असे म्हणत वरुण धवनने सलमान खानच्या शब्दांनी आत्मविश्वास मिळाल्याचं सांगितलं.
बॉर्डर २ हा सिनेमा वरुण धवनच्या करिअरमधील महत्त्वाचा सिनेमा मानला जात आहे. त्याचे कारण म्हणजे कोविडनंतर प्रदर्शित झालेल्या वरुण धवनच्या कोणत्याही सिनेमाला ‘बॉर्डर २’इतके यश मिळालेले नाही. ‘बॉर्डर २’ने भारतात २२ दिवसांत ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे.
अनुराग सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या बॉर्डर २ या चित्रपटात अहान शेट्टी, सनी देओल, दिलजीत दोसांझ, वरुण धवन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसतात. हा चित्रपट सनी देओलच्या सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
