Varun Dhawan on dhurandhar movie success : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या जोरदार चर्चेमध्ये आला आहे. ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केल्याने रणवीर सिंह यशाच्या शिखरावर आहे. याच दरम्यान, अभिनेता वरुण धवनने धुरंधर चित्रपटाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. धुरंधर चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद हे दिग्दर्शकाचे यश असल्याचे वरुण धवनने म्हटल्याने चर्चांना उधाण आले आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
निर्माते डेव्हिड धवन यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिनेता वरुण धवन सहभागी झाला होता. प्रश्नोत्तरावेळी, बदलत्या काळातील चित्रपट निर्मिती आणि निर्मात्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. आजच्या काळात चित्रपटांची निर्मिती कशी बदलली आहे आणि निर्मात्यांना पूर्ण स्वातंत्र्याने चित्रपट का बनवता येत नाहीये याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
प्रत्येकजण स्वतःला पत्रकार समजतो – डेव्हिड
यावर डेव्हिड धवन म्हणाले, “मला वाटते, ज्यांच्या हातात पेन आणि फोन असतो, तो प्रत्येकजण स्वतःला पत्रकार समजतो. हे खूप अवघड झाले आहे. कोणते चित्रपट हिट आहेत आणि कोणते नाहीत, हे मला कळत नाही. बॉक्स ऑफिसच्या कमाईचा अंदाज लावणे खूप कठीण आहे,” असे डेव्हिड धवन म्हणाले आहेत.
धुरंधरचे यश हे दिग्दर्शकांचे यश – वरुण
‘चित्रपटसृष्टी हे सगळे अभिनेते चालवतात. हे आधीही असेच होते आणि आजही आहे,’ असे मत डेव्हिड धवन यांनी व्यक्त केले. यावर वरुण धवनने असे तुम्हाला का वाटते असा प्रतिप्रश्न करत धुरंधरचे उदाहरण दिले. आदित्य धर सारखे लोक पुढे येत आहेत आणि चित्रपट तयार करत आहेत. धुरंधरचे यश हे दिग्दर्शकांचे यश असल्याचे वरुण धवन म्हणाला आहे. डेव्हिड यांनीदेखील हा मुद्दा मान्य केला असून, पुढे असे नमूद केले की, चित्रपटसृष्टीमध्ये फार कमी जण आदित्य धरसारखे आहेत, कदाचित तो एकमेव आहे, असे डेव्हिड धवन म्हणाले आहेत. यावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले.
David Dhawan : Movies become hits because of the actor, it was true earlier and still is.
— r (@bekhayalime) May 25, 2026
Varun Dhawan: Dhurandhar was a director’s success, not the actor’s.
No one is giving credit to Ranveer Singh, which is why Ranveer’s next movie Pralay, isn’t finding producers https://t.co/f522QGUBSi pic.twitter.com/pJMseee9ZD
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
‘धुरंधर’ चित्रपटाचे यश हे आदित्य धर सारख्या दिग्दर्शकांचे असल्याचे वरुणने म्हटल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत. यामुळे वरुणला रणवीर सिंहबद्दल असुरक्षितता वाटत असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, यामुळे हे लोक रणवीर सिंहचा किती द्वेष करतात हे दिसून आले. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, हमजा भूमिकेला रणवीर सिंहशिवाय कोणीच न्याय देऊ शकले नसते. हे एकाचे नाही तर दिग्दर्शक आणि अभिनेता दोघांचे यश आहे. वरुण धवनच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

वरुण धवनचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता वरुण धवनचा ‘हे जवानी तो इश्क होना है’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनीच केले असून पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘चुनरी चुनरी’ या लोकप्रिय गाण्याचा परवानगीशिवाय रिमेक केल्याने वाद सुरु झाला आहे. ‘बीवी नंबर १’ चित्रपटाचे निर्माते वाशू भगनानी यांनी संबंधित गाण्यांबाबत परवानगी न घेता रिमेक केल्याचा आरोप केला आहे.
