Varun Dhawan Talks About Wife Natasha Dalal : सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ व अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बॉर्डर २’ने प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. चित्रपटाला मिळत असलेल्या या प्रतिसादानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

या संवादादरम्यान वरुण धवनने चित्रपट पाहिल्यानंतर पत्नी नताशा दलालची प्रतिक्रिया काय होती, हे सांगितलं. त्याच्या अभिनयाबद्दल नताशानं दिलेली प्रतिक्रिया अतिशय स्पष्ट आणि थेट होती, असं वरुणनं सांगितलं. पत्नीची प्रतिक्रिया सांगत वरुण म्हणाला, “ती नेहमीच म्हणते, मला माहिती होतं, हे तुझ्यात आधीपासूनच आहे. फक्त तुला स्वतःलाच आव्हान द्यायचं आहे. आता ती असंही म्हणते की, जास्त पोस्ट करू नकोस, जास्त दिसू नकोस, जास्त बोलू नकोस. घरीसुद्धा ती म्हणते की, जास्त बोलू नकोस, बाहेरही तेच सांगते- जास्त बोलू नकोस. हो, सनी सर आणि माझी धर्मपत्नी दोघेही मला एकच गोष्ट सांगतात.”

‘बॉर्डर २’ सिनेमागृहांत प्रदर्शित होण्यापूर्वी वरुण धवनला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. ट्रेलरमधील त्याच्या स्माइलनं लोकांचं लक्ष वेधलं आणि त्यावर जोरदार ट्रोलिंग सुरू झाली, ज्यामुळे तो ‘बॉर्डर २’मधील पात्र परमवीर चक्र प्राप्तकर्ता कर्नल होशियार सिंग दहियासाठी योग्य आहे की नाही याबाबत शंका निर्माण केल्या गेल्या; पण वरुण शांत राहिला आणि त्यानं कामातून उत्तर दिलं. आज माध्यमांशी बोलताना, अभिनेत्यानं सांगितलं की, ट्रोलिंगच्या काळातही सलमान खाननं त्याला कॉल करून पाठिंबा दिला होता.

सलमान खानने वरुण धवनला दिलेला पाठिंबा

त्यानं सांगितलं, “मी हेदेखील सांगू इच्छितो की, जेव्हा हे सगळं घडत होतं, त्या रात्री सलमानचा मला कॉल आला आणि तो फक्त हसत होता. त्यानं मला फक्त इतकंच सांगितलं, चांगल्या गोष्टी येणार आहेत. एवढंच त्यानं सांगितलं. त्याचं मार्गदर्शन आणि विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. नंतर, जेव्हा ‘बॉर्डर २’ प्रदर्शित झाला आणि खूप यश मिळवलं, तेव्हा त्यानं पुन्हा मला कॉल करून सांगितलं की, तो आमच्यावर खूप खूश आहे.

सलमानबद्दल वरुण पुढे म्हणाला, “त्यानं जे काही सांगितलं, ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, मला आठवतंय की २ वाजले होते आणि त्याचे शब्द ऐकून मी खूप आनंदी झालो होतो कारण- तो म्हणालेला की, मला तुझा अभिमान आहे. तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण होता. कारण- तो सहज लोकांचं कौतुक करत नाही. त्याच्या कौतुकामुळे माझा आत्मविश्वास वाढला. शेवटी, मी या चित्रपटावर आणि भगवान श्रीकृष्णावर विश्वास ठेवला आणि आता जे काही आहे, तो इतिहासाचा भाग आहे.”