Actress Jasmine Dhunna Vanished From Showbiz Where is She? ८० च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘वीराना’ अभिनेत्री जास्मिन धुन्ना गेल्या चार दशकांपासून गायब आहे. जास्मिन धुन्नाने अवघ्या १३ व्या वर्षी १९७९ मध्ये ‘सरकारी मेहमान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. या चित्रपटाचे हिरो विनोद खन्ना होते. हा चित्रपट फारसा चालला नाही आणि मग जास्मिन काही वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिली. तिने १९८८ साली ‘वीराना’ या भयपटातून पुनरागमन केलं. हा चित्रपट हिट झाला आणि जास्मिन स्टार झाली.
रामसे ब्रदर्सच्या ‘वीराना’ या चित्रपटात जास्मिनने आत्म्याने झपाटलेल्या महिलेची भूमिका साकारली होती. या कल्ट क्लासिक चित्रपटात हेमंत बिर्जे यांनीही काम केलं होतं. हा चित्रपट रामसे ब्रदर्सच्या सर्वाधिक गाजलेल्या सिनेमांपैकी एख ठरला. ‘वीराना’नंतर जास्मिनने इतर कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. आता इतक्या दशकांनंतरही ती फक्त याच भूमिकेसाठी ओळखली जाते.
…अन् जास्मिन धुन्नाने अभिनय न करण्याचा निर्णय घेतला
‘वीराना’च्या यशाने जास्मिनची लोकप्रियता खूप वाढली. दिग्दर्शक दीपक रामसे यांनी एकदा म्हटलं होतं की, नवीन चित्रपटांमध्ये साईन करण्यासाठी निर्मात्यांनी जास्मिनच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. या चित्रपटाने ती एका रात्रीत स्टार झाली होती. मात्र, जास्मिनने नवीन संधी स्वीकारल्या नाहीत. रामसे यांच्या मते, जास्मिनने यापुढे चित्रपटांमध्ये काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. तसेच तिने फोन उचलणंही बंद केलं.

जास्मिन धुन्नाने कोणाशीच ठेवला नाही संपर्क
दीपक रामसे यांनी सांगितलं होतं की, जास्मिन सुरुवातीला संपर्कात होती. पण पुढे अभिनय करायचा नाही, असं तिने आधीच स्पष्ट केलं होतं. आपल्याला पुढे चित्रपटांमध्ये काम करण्यात रस नाही, त्यामुळे निर्मात्यांना तिचा संपर्क क्रमांक देऊ नये, असं तिने तुलसी रामसे आणि श्याम रामसे यांना सांगितलं होतं. त्यांनी तिच्या निर्णयाचा व विनंतीचा मान ठेवला. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसा संपर्क हळूहळू बंद झाला. त्यामुळे आता जास्मिन धुन्ना कुठे आहे? याबद्दल ‘वीराना’मध्ये त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनाही काहीच माहिती नाही.

अंडरवर्ल्डच्या धमक्या ते दाऊद इब्राहिमबद्दल अफवा
जास्मिनने अचानक बॉलीवूड सोडण्याबद्दल बरेच तर्कवितर्क लढवले गेले. त्यापैकी एक अफवा अशी होती की, ‘वीराना’च्या यशानंतर जास्मिने मुंबईतील अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या नजरेस पडली. तिला धमक्या मिळाल्याचा दावाही काही अहवालांमध्ये करण्यात आला, तर काहींनी ती गायब होण्याचा संबंध थेट दाऊद इब्राहिमशी जोडला. पण जास्मिन कधीच समोरही आली नाही. दीपक रामसे यांनी सांगितलं होतं की त्यांनी अशा अफवा ऐकल्या होत्या, पण त्या खरं आहेत की नाही याची खातरजमा ते करू शकले नाहीत.

जास्मिन धुन्ना कुठे आहे? गूढ अजूनही कायम
दीपक रामसे यांच्या मते, ‘वीराना’नंतर जास्मिन काही संपर्कात होती, पण नंतर मात्र तिने कोणताच संपर्क ठेवला नाही. जास्मिन कुठे आहेत हे माहीत नसल्याची कबुली त्यांनी एका मुलाखतीत दिली होती. त्यानंतर जास्मिन नक्की कुठे गेली, याबद्दलचे गूढ आणखी वाढले. ‘वीराना’ला जवळपास चार दशकं लोटली तरी जास्मिन धुन्नाबद्दल काहीच माहिती नाही. तर दुसरीकडे, हेमंत बिर्जे यांनी दावा केला की त्यांचं तिच्याशी बोलणं झालं होतं आणि ती आता युनायटेड स्टेट्समध्ये राहते. वैयक्तिक अडचणींमुळे तिने अभिनय सोडल्याचंही म्हटलं गेलं. पण जास्मिन पुन्हा कधीच कॅमेऱ्यासमोर आली नाही आणि या चर्चांवर कधी प्रतिक्रियाही दिली नाही.
