He-Man of Bollywood Dharmendra Death : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देओल कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींना धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप दिला.
ब्लॉकबस्टर शोलेतल्या ‘विरु’सह अनेक सशक्त भूमिका साकारणारे दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी आज, २४ नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या काळात त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. नंतर त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली होती. अनेक बॉलीवूड स्टार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणलं आणि घरीच उपचार सुरू होते. पण आता उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. आमिर खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, संजय दत्तसह देओल कुटुंबातील हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल या सर्वांनी विले पार्ले येथील स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप दिला.
धर्मेंद्र यांचे बालपण
८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल होते. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांनी एकदा सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात पाहिला. त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी सलग ४० दिवस हा चित्रपट पाहिला होता. एकदा धर्मेंद्र यांना समजलं की फिल्मफेअर नव्या कलाकारांच्या शोधात आहे. त्यांनी अर्ज भरला आणि टॅलेंट हंटमध्ये निवड झाल्यावर ते मुंबईत आले.

धर्मेंद्र यांचे करिअर
धर्मेंद्र यांनी १९६० च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. धर्मेंद्र यांनी अॅक्शन, कॉमेडी, लव्ह स्टोरी अशा प्रत्येक शैलीतील सिनेमे केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. १९७० च्या दशकात धर्मेंद्र ‘अॅक्शन हिरो’ म्हणून इतके लोकप्रिय झाले की लोक त्यांना ‘ही मॅन’ म्हणू लागले. १९७५ मध्ये आलेला ‘शोले’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली, त्याचबरोबर सिनेमातील ‘बसंती’ म्हणजेच हेमा मालिनी यांची त्यांच्या खऱ्या आयुष्यात एंट्री झाली. ‘सीता और गीता’ मधील त्यांची दुहेरी भूमिका असो वा ‘चुपके चुपके’ हा त्यांचा विनोदी चित्रपट असो; त्यांनी प्रत्येक भूमिका उत्तमरित्या वठवली. आपल्या करिअरमध्ये ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या धर्मेंद्र यांनी प्रत्येक पात्राने लोकांची मनं जिंकली.
धर्मेंद्र यांना २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. धर्मेंद्र वयाच्या ८९ व्या वर्षीही चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. धर्मेंद्र यांचे दोन चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. ते ‘इक्कीस’ व ‘मैने प्यार किया फिर से’ मध्ये झळकणार आहेत.
