Tiku Talsania suffers Brain Stroke: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते टिकू तलसानिया यांच्या प्रकृतीबद्दल मोठी बातमी आली आहे. टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आली होती, पण त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आहे. ते सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
७० वर्षीय टिकू एका सिनेमाच्या स्क्रीनिंगला गेले होते, तिथे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते लवकर बरे व्हावे, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा – लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
टिकू तलसानिया त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी हिंदी, मराठी आणि गुजराती थिएटरमध्येही काम केले आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये विविधांगी भूमिका वठवणाऱ्या टिकू तलसानिया यांनी तब्बल २५० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. त्यांनी आमिर खानबरोबर ‘अंदाज अपना-अपना’ चित्रपटात आणि शाहरुख खानबरोबर ‘देवदास’ चित्रपटात काम केलं आहे. ते नुकतेच ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’मध्येही होते.
टिकू तलसानिया हे मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी १९८४ मध्ये ‘ये जो है जिंदगी’ या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. टिकू तलसानिया ‘इश्क’, ‘जोडी नंबर 1’ आणि ‘पार्टनर’ सारख्या कॉमेडी क्लासिक्समधील जबरदस्त कॉमिक परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात.
हेही वाचा – ‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
टिकू तलसानिया यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ‘सजन रे फिर झुठ मत बोलो’, ‘ये चंदा कानून है’, ‘एक से बढकर एक’ आणि ‘जमाना बदल गया है’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
टिकू तलसानिया यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार लोकांना माहीत नाही. टिकू यांचे लग्न दीप्ती तलसानियाशी झाले आहे. या जोडप्याला दोन अपत्ये आहेत. टिकू तलसानिया यांचा मुलगा रोहन तलसानिया हा एक उत्कृष्ट गायक आहे तर त्यांची मुलगी शिखा तलसानिया अभिनेत्री आहे.