Mumtaz on Fardeen Khan: ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरीही त्यांची अनेक वक्तव्ये मात्र सतत लक्ष वेधून घेतात. मुमताज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.त्यांनी त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल केलेले वक्तव्य असो किंवा राजेश खन्ना, आशा भोसले, अक्षय कुमार अशा अनेक कलाकारांबद्दल केलेले वक्तव्य असो, मुमताज यांच्या वक्तव्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

आता मुमताज यांनी त्यांच्या मुलगी आणि अभिनेता फरदीन खान यांच्या लग्नाबद्दल, घटस्फोटाबद्दल केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेता फरदीन खानने मुमताज यांची मुलगी नताशाबरोबर लग्न कले आहे. त्यांनी २००५ मध्ये जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. मात्र, आता ते वेगळे झाले आहेत. २०२३ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता मुमताज यांनी यावर वक्तव्य केले आहे.

“ते त्यांचे आयुष्य…”

मुमताज यांनी सितारों का सफर ला मुलाखत दिली. या मुलाखतीत फरदीन व नताशाच्या वेगळे होण्याबद्दल म्हणाल्या, “ते त्यांचे आयुष्य आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त काही बोलणार नाही. कारण-ते दोघे आता मोठे आहेत, त्यांना मुलंही आहेत.”

फरदीनबद्दल त्या म्हणाल्या, “फरदीन खूप चांगला आणि प्रेमळ व्यक्ती आहे. आजही तो मुलांना भेटण्यासाठी लंडनला जातो. नताशा जेव्हा आजारी होती, तेव्हा कितीतरी वेळा तिला भेटण्यासाठी आला. आजकालचे पुरुष असं काही करतील, याची मला अपेक्षा नव्हती, पण फरदीनने ते केले.”

“जरी ते वेगळे झाले असले तरीही…”

याआधीही मुमताज यांनी फरदीन व नताशाच्या नात्याबद्दल वक्तव्य केले होते. त्या म्हणालेल्या, “जरी ते वेगळे झाले असले तरीही त्यांचा घटस्फोट झाला नाही. माझं फरदीनवर खूप प्रेम आहे. ते अजूनही पती-पत्नी आहेत. प्रत्येक लग्नात चढ-उतार येतात. जरी त्यांनी घटस्फोट घेतला तरी मुलांमुळे ते वेगळे होणार नाहीत.

विकी लालवाणीला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणालेल्या, “मुले नताशाबरोबर असतात म्हणून जेव्हा जेव्हा त्यांना सुट्टी असते तेव्हा फरदीन त्यांना सुट्टीवर घेऊन जातो. माझी मुलगीही आनंदाने ते मान्य करते. ते दोघेही मुलांना फुलासारखे जपतात, त्यांना सर्वत्र घेऊन जातात. तो एक अदभुत वडील आणि खूप चांगला नवरा आहे. तो त्याच्या मुलांना स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो.”

नताशा आणि फरदीन यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त करीत मुमताज म्हणाल्या, “तो खूप चांगला आणि उत्तम व्यक्ती आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, माझा आदर करतो. मी अजूनही देवाला प्रार्थना करते की, त्या दोघांनी एकत्र यावे. पण नियतीला काय मान्य आहे, माहीत नाही. त्याने आतापर्यंत इतर कोणाशीही लग्न केलेले नाही. “त्या दोघांनाही विचार करून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा लागेल. मी काहीही बोलू शकत नाही किंवा त्यांना जबरदस्ती करू शकत नाही, ते मोठे आहेत. मी फरदीनला २-४ वेळा विचारले आहे की, तुम्ही दोघे एकत्र का राहू शकत नाही? तो मला म्हणाला की बघूयात.”