Swati Chitnis on Amrish Puri: स्वाती चिटणीस यांनी फक्त मराठी मनोरंजनसृष्टीतच नाही, तर हिंदीमध्येही मोठ्या प्रमाणात काम केले आहे. नाटक, सिनेमा, मालिका या माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध, दिग्गज कलाकारांबरोबरही काम केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वाती चिटणीस यांनी अमरीश पुरी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. त्या नेमकं काय म्हणाल्यात, याबद्दल जाणून घेऊ…
“दारात अमरीश पुरीसाहेब….”
स्वाती चिटणीस यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या कॅचअप या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी अमरीश पुरी यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “एके दिवशी सकाळी ६ वाजता घराची बेल वाजली. आईनं जाऊन दार उघडलं. दारात अमरीश पुरीसाहेब होते. आईनं मला उठवलं. अमरीश पुरी म्हणाले की, उद्या आपण आधे अधुरे या नाटकाचा प्रयोग करणार आहोत, त्यात तू काम करणार आहेस. मोठी मुलगी बिन्नीचे पात्र तू साकारणार आहेस. त्याच्या सरावासाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. मी तयार होऊन लगेच रिहर्सलला गेले. तिथे सगळे होते. मी रिहर्सल करीत असताना पुरीसाहेबांनी मला खूप सांभाळून घेतलं. प्रयोग जळगावला होता. आम्ही रात्री रेल्वेनं गेलो. सकाळी सगळे जण फिरायला गेले. पण, पुरीसाहेब म्हणाले की, स्वाती फिरायला जाणार नाही, ती माझ्याबरोबर बसेल, आराम करेल आणि सराव करेल. ते वडिलकीचं नातं होतं.”
“ते माझ्या लग्नाला…”
पुढे त्या म्हणाल्या, “ते इतक्या भूमिका साकारायचे; पण तो माणूस इतका हळुवारपणे बोलायचा. टचकन त्यांच्या डोळ्यांत पाणी यायचं. ते माझ्या लग्नाला आले होते. रिसेप्शन संपत आलं होतं. त्यावेळी दुबे, गोविंद निहलानी व अमरीश पुरी आले होते. पुरीसाहेबांनी मला प्रेशर कुकर दिला होता. तो प्रेशर कुकर मी आजही वापरते. त्यांच्या आठवणीसाठी जपून ठेवला आहे. रिसेप्शन संपलं आणि आम्ही स्टेजवरून खाली उतरलो. पुरीसाहेब एखाद्या लहान मुलासारखे ढसाढसा रडत होते. मला जवळ घेऊन अमोलला म्हणाले की, आमच्या मुलीला सांभाळा, खूप दूर घेऊन जात आहात. तो क्षण माझ्या आयुष्यभर लक्षात राहिला आहे.”
स्वाती चिटणीस यांनी याच मुलाखतीत अमरीश पुरी यांची आणखी एक आठवण सांगितली. एका कार्यक्रमाला त्यांना बोलवायचे होते, त्यावेळी ते लगेच आले. तसेच त्यांनी कोणतेही मानधन घेतले नाही. अभिनेत्री म्हणाल्या की, ते अप्रतिम माणूस होते. तसेच त्या असेही म्हणाल्या की, मला इतकी चांगली माणसं मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते.
दरम्यान, अमरीश पुरी हे बॉलीवूडमधील खलनायक म्हणून लोकप्रिय होते. त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांचे सिनेमे लोकप्रिय ठरले. आजही अमरीश पुरी यांचा अभिनय, त्यांच्या भूमिका यांबद्दल बोलले जाते. पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारणारे अमरीश पुरी खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत संवेदनशील होते, असे त्यांच्याबरोबर काम केलेले कलाकार वेळोवेळी सांगताना दिसतात.
