Sushmita Sen Was Not The First Choice For Main Hoon Na : बॉलीवूडमध्ये आजवर प्रेम, मैत्री आणि महाविद्यालयीन जीवनावर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शाहरुख खान व सुश्मिता सेनचा ‘मैं हूँ ना’ हा चित्रपट. या चित्रपटातील दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप हिट ठरली होती आणि आजही त्यातील गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. अशातच आता फराह खानने याबद्दल एक खुलासा केला आहे.
‘मैं हूँ ना’ या चित्रपटात शाहरुख खानने मेजर राम प्रसाद शर्मा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जो एका कॉलेजमध्ये विद्यार्थी बनून वावरत असतो, त्याच कॉलेजमध्ये सुश्मिता सेन शिक्षिका असते. त्यामुळे या चित्रपटात शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळते. तर दुसरीकडे या चित्रपटात मधू खेर, अमृता राव, बोमन इराणी, सुनील शेट्टी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांत पाहायला मिळतात.
‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला होती पहिली पसंती
फराह खाननं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली. अशातच आता तिनं याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. फराह खाननं तिच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत याबद्दल सांगितलं आहे. तिनं यावेळी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समीरा रेड्डीला भेट दिली असून, तिनं सांगितलं की, ‘मैं हूँ ना’साठी सुश्मिता शेट्टीच्या आधी समीरा रेड्डीची निवड केलेली. फराह याबद्दल नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊयात…
फराह म्हणाली, “कोणालाही माहीत नाहीये; पण मी एकदा ‘मैं हूँ ना’मधील सुश्मिता सेनच्या भूमिकेसाठी विचार केला होता. मी तुझं एशिता किजीये बातें हे गाणं पाहिलेलं आणि तुला भारतीय पेहरावात पाहिलं होतं.” फराह खानच्या चित्रपटात आपण झळकलो असतो आणि आपल्या नावाचा विचार झालेला हे कळल्यानंतर समीरा चकित होत म्हणाली, “मला जाणून घ्यायचं आहे की, तू माझी निवड का केली नाहीस मग?”
…म्हणून झाली सुश्मिता सेनची निवड
समीरानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत फराह म्हणाली, “कारण- त्यावेळी तुझी मैने दिल तुझको दिया या चित्रपटासाठी निवड झालेली.” २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात समीरा रेड्डी व सोहेल खान झळकले होते. समीराला फराह खाननं ‘मैं हूँ ना’बद्दल सांगितल्यानंतर तिला वाईट वाटलं.
सुश्मितानं या चित्रपटात चांदनी या शिक्षिकेची भूमिका उत्तमपण साकारलेली. तिच्या लोकप्रिय भूमिकांपैकी ती एक मानली जाते. त्यातील तिचे साडीतील फोटो व लूक तुफान व्हायरल झाले होते. ‘मैं हूँ ना’ चित्रपट २००४ मधील हिट चित्रपट होता. फराह खाननं त्यामधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलेलं. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा दुसरा भाग येणार अशा चर्चा होत्या; परंतु, फराह खाननं अफवा म्हणून त्या चर्चांना पूर्णविराम दिला.
दरम्यान, समीरा रेड्डीनं ‘दे दना दन’, ‘रेस’, ‘नो एन्ट्री’, ‘मुसाफिर’ आणि इतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.

