Vicky Kaushal Best Actor Award : ‘झी सिने अवॉर्ड्स’ पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी जमली होती. वरुण धवन, विकी कौशल, क्रिती सेनॉन, अनन्या पांडे असे असंख्य कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. यंदा ‘झी सिने अवॉर्ड्स’मध्ये विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाने बाजी मारली आहे.
विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार जिंकल्यावर त्याने खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. विकी लिहितो, “मला छावा चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी ‘झी सिने अवॉर्ड्स’चे मनापासून आभार मानतो. हे श्रेय ‘छावा’ सिनेमाच्या संपूर्ण टीमचं आहे. आमचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, निर्माते दिनेश विजान सर या दोघांचे विशेष आभार… कारण, त्यांनी माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास ठेवला. सर्वात शेवटी मी माझ्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानतो…तुमच्या प्रेमामुळे हे शक्य झालं आणि मी वचन देतो की, तुम्ही दाखवलेल्या या प्रेमाला मी कधीच गृहीत धरणार नाही.”
शाम कौशल यांची खास कमेंट
विकीला पुरस्कार मिळताच त्याचे सगळे चाहते, अभिनेत्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विकीचे वडील शाम कौशल या पोस्टवर कमेंट करत लिहितात, “ही सगळी देवाची कृपा आहे आणि तुझ्या संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. तू आणि तुझ्या सिनेमाच्या टीमने खरंच खूप मेहनत घेतली होती आणि तुम्हाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तुझा खूप अभिमान वाटतोय…तुला जोर दी झप्पी! ( प्रेमाने मिठी मारतो ) रब रखा!”
तर, विकीच्या भावाने “जे बात मेरे शेर” असं या पोस्टच्या कमेंट्समध्ये लिहिलं आहे. अभिनेता संतोष जुवेकरने सुद्धा विकीचं कौतुक केलं आहे. ‘छावा’मध्ये संतोषने सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. “Paaji तुम्ही डिझर्व्ह करता..तुमचं खूप खूप अभिनंदन” असं संतोषने म्हटलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी सुद्धा विकीच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय ‘झी सिने अवॉर्ड्स २०२६’ मध्ये ‘छावा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट देखील ठरला आहे. तर, विनीत कुमार सिंहला ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा’ पुरस्कार मिळाला आहे.
