विकी कौशल आणि कतरिना कैफ नोव्हेंबर २०२५ मध्ये आई-बाबा झाले. तेव्हापासून विकी अनेकदा वडील होण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने पहिल्यांदा वडील झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल भाष्य केलं. हा अनुभव त्याच्यासाठी खूप कमाल असल्याचं त्याने सांगितलं. गेल्या काही महिन्यांत आयुष्य पूर्ण आणि समाधानी झाल्यासारखं अनेकदा वाटल्याचंही विकीने म्हटलं.
“काय आणि कसा बदल झाला हे सांगता येणार नाही. पण मी एवढंच सांगू शकतो की हा अनुभव खरोखरच कमाल आहे. ही भावना इतकी खास आहे की ती नेमकी कशी आहे, हे सांगण्यासाठी कदाचित पुरेसे शब्दही नाहीत,” असं विकीने हरित झवेरी ज्वेलर्सच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर त्याने मुलाबरोबर घालवलेल्या खास क्षणांबद्दलही सांगितलं.
मुलाबरोबरच्या खास क्षणांबद्दल विकीची प्रतिक्रिया
“दररोजचा प्रत्येक छोटासा क्षण… जेव्हा तुमचं मूल हसतं, त्याचा पहिला रडण्याचा आवाज, चेहऱ्यावरचे पहिले नवे भाव आणि पहिली नवी हालचाल… हे सगळं पाहणं आणि अनुभवणं खूप सुंदर आहे. असं म्हणतात की माणूस कधीच समाधानी होत नाही. पण गेल्या १० महिन्यांत मी असे अनेक क्षण जगलो, जेव्हा मला वाटलं की बस, हेच पूर्णत्व आहे, मला आता आणखी काही नको. मला असं अनेकदा जाणवलं,” असं त्याने म्हटलं.
कतरिनाबद्दल काय म्हणाला?
कतरिनाबद्दल बोलताना विकी म्हणाला, “त्या क्षणी तुमच्या बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुमच्या मुलाचं खळखळून हसणं पाहताना तुम्हालाही तो क्षण जगावासा वाटतो. वाटतं की हा क्षण थांबवता आला असता तर आणखी काही वेळ असाच जगता आला असता. हा अनुभव खरंच खूप सुंदर आहे. मला वाटतं, यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील होतो. त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून तुमची जबाबदारीही वाढते. कारण आता तुम्ही ज्या गोष्टी इतरांना सांगता, त्याच स्वतःच्या आयुष्यात आचरणात आणाव्या लागतात.”
विकीने सांगितलं की, आता तो स्वतःच्या वागण्याकडे अधिक लक्ष देऊ लागला आहे. “मुलं नकळतपणे ते घरात जे पाहतात, त्यातून शिकतात. ते त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या वागण्यावर लक्ष द्यावं लागतं. गेल्या १० महिन्यांत मी जितकं स्वतःचं निरीक्षण केलं आहे, तितकं याआधी कधीच केलं नव्हतं. तुमच्या मुलाला तुमच्याकडून काही शिकता यावं यासाठी तुम्हालाही तसं वागावं लागतं.” असं त्याने सांगितलं.
