विकी कौशलने त्याच्या कामातून आजवर अनेकांकडून कौतुकाची दाद मिळवली आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट, भूमिका हे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. पण, फक्त व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही तर अभिनेता खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता तर तो त्याच्या वडील या नवीन आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची भूमिकेत असेल. अशातच आता अभिनेत्याने वडील होण्याबद्दल आणि एकूणच पालकत्वाबद्दल भाष्य केलं आहे.
वडील होणं ही जबाबदारीची गोष्ट असते आणि मुलं किती लवकर मोठी होतात असं म्हटलं जायतं ते आता समजतंय अशा भावना अभिनेत्याने त्याचा ७ महिन्यांचा मुलगा विहान कौशलबद्दल बोलताना सांगितलं आहे. मुलाच्या जन्मानंतर सहा आठवडे ब्रेक घेतल्यानंतर आणि कतरिना व विहानबरोबर छान वेळ घालवल्यानंतर जेव्हा विकीने पुन्हा कामाला सुरुवात केली तेव्हा त्याला कामाच्यावेळी मुलाची आठवण यायची असं त्याने सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, “माझं मन सुन्न झालं, ते खूप कठीण होतं.”
वडील होण्याबद्दल विकी कौशलने व्यक्त केल्या भावना
विकी याबद्दल म्हणाला, “पालक झाल्यापासून मला जवळपास रोजच नव्या भावना अनुभवायला मिळत आहेत. हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव आहे. आधी लोक म्हणायचे, अरे, मुलं किती पटकन मोठी होतात, तेव्हा मला वाटायचं, काय बोलताय? तुमचं मूल तर अजून एक वर्षाचं आहे. पण आता मला त्याचा खरा अर्थ समजतोय”.
विहान अजून फक्त सात महिन्यांचा असला तरी विकी कौशलला तो कसा पालक बनू इच्छितो याची स्पष्ट कल्पना आहे. विहान मोठा होऊन कसा माणूस बनेल याची जबाबदारी स्वतःची असल्याचंही त्याने सांगितलं. प्रत्येक मूल आपल्या आई-वडिलांच्या वागण्या-बोलण्यातूनच शिकत असतं, असा त्याचा विश्वास आहे.
विहानवर संस्कार करण्याबद्दल विकी म्हणाला, “मुलाला योग्य संस्कार देण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे, याची जाणीव मला अनेकदा अगदी अनपेक्षित क्षणी होते. तो आपल्या आई-वडिलांचे विचार, बोलणं आणि वागणं पाहूनच शिकणार आहे. त्यामुळे मला जाणवलं आहे की, मला त्याच्यामध्ये जे गुण पाहायचे आहेत, ते केवळ शब्दांत सांगून नाही तर माझ्या स्वतःच्या कृतीतून दिसले पाहिजेत”.
पुढे बोलताना विकीने सांगितलं की, स्वतः वडील झाल्यानंतर त्याला आपल्या आई-वडिलांविषयी अधिक आदर आणि कृतज्ञता वाटू लागली आहे. “आता मागे वळून माझ्या बालपणाकडे पाहतो तेव्हा आई-वडील अनेक गोष्टींबाबत बरोबर होते, याची जाणीव होते. आमची आर्थिक परिस्थिती फार बरी नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे ताण होते. तरीही त्यांनी माझ्यामध्ये योग्य संस्कार आणि मूल्ये रुजवण्याची जबाबदारी पार पाडली”.
