Vicky Kaushal Katrina Kaif relationship advice : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक म्हणून विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या नात्याची सुरुवात शांततेत आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर झाली, पण तरी त्यांच्यातील केमिस्ट्रीची नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेत होते. या दोघांच्या नात्याचा सर्वात मजबूत पाया म्हणजे परस्परांबद्दल असलेला आदर. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले असतानाही, त्यांनी एकमेकांच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि मतांचा अत्यंत सहजतेने स्वीकार केला आहे. विकी अनेकदा कतरिनाचं कौतुक करतो, तर कतरिना विकीच्या शांत स्वभावाचा आदर करते.

सार्वजनिक ठिकाणी असो किंवा सोशल मीडियावर, दोघांमधील एकमेकांबद्दलचं प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. कतरिनाबरोबरच्या लग्नानंतर आयुष्यात अधिक स्थिरता आणि आनंद आला आहे, असं विकी म्हणतो. तर कतरिनाच्या मते विकी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा एक सच्चा जोडीदार आहे.

अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज…- विकी कौशल

कतरिना कैफसाठी विकी कौशल एक उत्तम जोडीदार आहे. २०२३ मध्ये ‘न्यूज तक’शी बोलताना विकीने लग्न टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते, ते सांगितलं होतं. “कोणतेही लग्न टिकण्यासाठी त्यात प्रेम असणं खूप गरजेचं आहे. मग ते अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज, एकमेकांबद्दल प्रेम, समजूतदारपणा आणि सहानुभूती असावीच लागते,” असं विकी कौशल म्हणाला होता.

“समोरची व्यक्ती वेगळी आहे आणि मी एक वेगळी व्यक्ती आहे, या दोघांनी मिळून एकमेकांना समजून घेणं हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नानंतर तुम्ही किंवा तुमच्या पार्टनरने पूर्णपणे बदलण्याची काहीही गरज नसते. जर तुमच्यात ही समज असेल आणि कुटुंबीय आनंदी असतील, तर तुम्ही कसे लग्न करता याने काहीही फरक पडत नाही,” असं मत विकी कौशलने मांडलं होतं.

मुंबईच्या भाटिया हॉस्पिटलच्या सल्लागार मानसशास्त्रज्ञ आणि फॅमिली थेरपिस्ट डॉ. माया किरपालानी यांनीही विकीच्या या मताशी सहमती दर्शवली. त्या म्हणाल्या की, लग्नामध्ये प्रचंड समजूतदारपणा आणि आदर असावा लागतो. “प्रत्येक व्यक्तीची स्वतःची मतं असतात, त्यामुळे त्यांचा आदर केला पाहिजे आणि ती मते समजून घेतली पाहिजेत. दोन व्यक्तींचे अनेक गोष्टींवर मतभेद असू शकतात, परंतु परस्परांबद्दल आदर असायलाच हवा. जर दोन्ही जोडीदार मॅच्युअर असतील, तर नातं अधिक घट्ट होते. पण जर अवाजवी अपेक्षा आणि ईगो असेल तर नात्यावर त्याचा वाईट परिणाम होतो,” असं त्यांनी सांगितलं.

“कोणत्याही नात्यात विश्वास आणि निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. आक्रमक न होता आपल्या गरजा आणि भावना एकमेकांजवळ व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. त्यामुले जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. एकमेकांचं ऐका, संवाद साधा आणि तुमच्या भावना व्यक्त करा,” असा सल्ला डॉ. किरपालानी यांनी दिला.