हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या लेकीचं स्वरा लोढाचं नुकतंच लग्न झालं. राजस्थान येथे शैलेश लोढा यांच्या लेकीचा भव्य लग्न सोहळा पार पडला. यावेळी लक्ष वेधलं ते बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने. शैलेश लोढांच्या लेकीच्या लग्नात विकी कौशलने फक्त हजेरीच लावली नव्हती तर त्याने लेकीच्या लग्नात भावुक झालेल्या शैलेश यांना आधारसुद्धा दिला आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे पाहुण्यांचं स्वागतही केलं.

शैलेश लोढा यांच्या लेकीच्या लग्नात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार गैरहजर राहिल्याने सोशल मीडियावर याबद्दल चर्चा झाली. मात्र, या मालिकेतील कोणतेच कलाकार आले नसले तरी एकट्या विकी कौशलच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. अनेकांना या दोघांमध्ये नेमके काय संबंध आहे. विकीने टीव्ही अभिनेत्याच्या लेकीच्या लग्नात उपस्थित राहण्यामागचं कारण काय असे प्रश्न पडले, पण खरंतर या दोघांचे खूप जुने संबंध आहेत.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार विकी कौशलच्या उपस्थितीमागे त्याची आणि शैलेश लोढा यांची मैत्री हे कारण असू शकतं असं म्हटलं जात आहे. तर अनेकदा सेलिब्रिटींना लग्न संमारंभांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिलं जातं हे ही त्या मागचं कारण असण्याची शक्यता आहे. परंतु, त्याच्या उपस्थितीमागचं ठोस कारण समोर आलेलं नाही. काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विकी कौशलचं कौतुकही केलं होतं. त्यांनी विकीबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं होतं, “विकी कौशलने अथक मेहनतीच्या जोरावर अफाट लोकप्रियता, यश आणि ओळख मिळवली आहे. इतकं यश मिळूनही त्याच्या स्वभावातील नम्रता तशीच कायम आहे. तो आजही आपल्या मुळांशी जोडलेला आहे आणि हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. विकी कौशलला खूप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम.”

जोधपूरमधील प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसमध्ये शैलेश लोढा यांच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात विकी कौशलने केवळ सेलिब्रिटी पाहुणा म्हणून हजेरी लावली नाही, तर तो प्रत्येक कार्यक्रमात मनापासून सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये विकी पाहुण्यांचं स्वागत करताना, लग्नाआधी शैलेश लोढा यांचा फेटा नीट बांधून देताना आणि लग्नानंतर वधू स्वराला प्रेमाने मिठी मारताना दिसला. त्याचा साधेपणा आणि आपुलकीचं वागणं पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं.

स्वरा लोढाचा विवाहसोहळा अतिशय खासगी स्वरूपात पार पडला. या लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळीच उपस्थित होते. विकी कौशलबरोबर कवी कुमार विश्वास यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांची सध्या जोरदार चर्चा होत आहे.