3 Idiots 2 sequel updates featuring Aamir Khan & Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशल शेवटचा २०२५ मधील ‘छावा’ या चित्रपटात दिसला होता. अशातच आता अभिनेता एका गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट म्हणजे आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘३ इडियट्स’ असल्याची चर्चा सुरू आहे.
आमिर खानने नुकतीच याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्याने सांगितलं की दिग्दर्शक राजकुमार हिराणी या चित्रपटाच्या पात्रांवर काम करत आहेत. ‘३ इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता दशकाहून अधिक काळ झाला असला, तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार विकी कौशलने याआधी राजकुमार हिरानी यांच्याबरोबर ‘संजू’ आणि ‘डंकी’मध्ये काम केलं आहे. आता ‘३ इडियट्स’च्या सीक्वलची कथा त्याला खूप आवडली आहे. या माध्यमानुसार सीक्वलमध्ये विकीच्या पात्रामुळे आमिर खान आणि इतर मूळ पात्रांबरोबर एक नवीन आणि भावनिक ट्विस्ट येणार आहे.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार विकी कौशलने आमिर खानबरोबर काम करण्याची आणि या चित्रपटातील इतर कलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. विकी, आमिर आणि राजकुमार हिरानी यांच्या यासाठी अनेक भेटीही झाल्याचं म्हटलं जातं. विकीने ‘३ इडियट्स २’ मधील चौथ्या पात्रासाठी होकार दिल्याचं म्हटलं जातं. मात्र, संपूर्ण टीमचं वेळापत्रक जुळल्यानंतरच हा प्रोजेक्ट पुढे जाईल. अशी माहिती समोर आली आहे. परंतु, विकी कौशलचा ‘३ इडियट्स’च्या सीक्वलमध्ये सहभाग असेल की नाही, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही.
आमिर खान नेमकं काय म्हणाला?
या बहुचर्चित प्रोजेक्टबद्दल बोलताना आमिर खानने एका मुलाखतीत सांगितलं की ‘३ इडियट्स’चा सीक्वल जवळपास १० वर्षांनंतरच्या रँचो, फरहान आणि राजू यांच्या आयुष्यावर आधारित असेल. ‘अमर उजाला’ला Amar Ujala दिलेल्या मुलाखतीत आमिरने याबद्दल सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, “राजू (Rajkumar Hirani) सध्या ‘३ इडियट्स २’वर काम करत आहे. मी त्याची कथा ऐकली आहे आणि ती खूप छान आहे.”
तो पुढे म्हणाला, “स्क्रिप्टवर अजून काम सुरू आहे, पण कथा खूप वेगळी आहे. पहिल्या चित्रपटासारखाच त्यात विनोद असेल आणि ही कथा १० वर्षांनंतरच्या पात्रांचा प्रवास दाखवेल.
२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटात आर.माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर यांसारख्या कलाकारांची ऑनस्क्रीन मैत्री आणि केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये काय पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांमध्येही उत्सुकता असेल.
