गेले काही दिवस आयफा पुरस्कारांची जोरदार चर्चा आहे. काल दुबईत हा पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेता विकी कौशल यांनी या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. पण या दरम्यानचा विकी कौशलचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
अभिनेता विकी कौशलने नेहमीप्रमाणेच त्याच्या उत्स्फूर्त सूत्रसंचालनाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना खिळवून ठेवलं. तर याचबरोबर त्याने त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचा प्रमोशनही तिथे केलं. यादरम्यान त्याने कलाकारांना थिरकायलाही लावलं. सारा आणि विकी या चित्रपटाचं प्रमोशन तिथे करत असताना त्यांनी राखी सावंतला मंचावर बोलावून तिच्याशी गप्पा मारल्या आणि तिला डान्सही करायला लावला. पण राखी बरोबर नाचताना विकी पडता पडता वाचला.
आणखी वाचा : IIFA पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटाचा डंका, ‘वेड’ला मिळाला ‘हा’ पुरस्कार, रितेश म्हणाला…
विकी, राखी आणि साराचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकी आणि सारा राखी सावंतबरोबर कतरिना कैफच्या गाण्यावर नाचत आहेत. आधी राखी ‘चिकनी चमेली’ हे गाणं गायला लागते. तर नंतर विकी तिला म्हणतो, “आपण ‘शिला की जवानी’वर नाचूया.” यावर राखी ही आनंदाने होकार होते आणि ते तिघं त्या गाण्यावर नाचायला लागतात. पण नाचता नाचता विकी गोल फिरतो आणि राखी त्याच्या बाजूला सरकते. त्यामुळे राखी अनावधानाने विकीला धडकते. टक्कर होण्यापासून स्वतःला वाचवताना विकीचा स्वतःचाच तोल जातो आणि तो पडता पडता वाचतो. हे पाहून साराची बोलतीच बंद होते.
दरम्यान आयफा २०२३ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘गंगुबाई काठेवाडी’, ‘दृश्यम २’, ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटांनी बाजी मारली तर मराठमोळ्या वेड चित्रपटालाही विशेष प्रादेशिक चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.