Vicky Kaushal In Dhurandhar 2 : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने केवळ ४७ दिवसांत भारतात ८२८.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा हा आकडा १२८७ कोटींपर्यंत पोहोचला आहे. ‘धुरंधर’ची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता दोन महिन्यांनी या चित्रपटाचा सीक्वेल म्हणजेच ‘धुरंधर: द रिवेंज’ प्रदर्शित होणार आहे आणि यात अभिनेता विकी कौशलचीसुद्धा एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अक्षय खन्ना ‘धुरंधर २’मध्ये रहमान डकैत ही भूमिका पुन्हा साकारणार नाही. तो या चित्रपटात फक्त काही फ्लॅशबॅक सीनमध्येच दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांची थोडी निराशा होणं साहजिक आहे. मात्र, प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमीही आहे. ती म्हणजे ‘धुरंधर २’मध्ये प्रेक्षकांना विकी कौशल पाहायला मिळणार आहे.

मिड-डेच्या वृत्तानुसार, अक्षय खन्ना ‘धुरंधर २’मध्ये फक्त फ्लॅशबॅक सीनमधून दिसणार आहे, तर विकी कौशल मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात तो ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’मधील मेजर विहान शेरगिल यांची भूमिका साकारणार आहे. मात्र याबाबत आदित्य धरने विकीच्या एन्ट्रीबाबत सध्या तरी काहीच माहिती दिलेली नाही.

‘धुरंधर: द रिवेंज’मध्ये विकी कौशल?

‘उरी’ची कथा २०१६ मधील असल्याने, विकीचं पात्र या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. मात्र विकी आणि रणवीर सिंह यांच्या पात्रांचा एकमेकांशी थेट सामना होतो की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यात काही अ‍ॅक्शन दृश्यांचाही समावेश आहे. विकीने २०२५ मध्येच ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या प्रदर्शनापूर्वी शूटिंग पूर्ण केले असल्याचं म्हटलं जात आहे.

‘धुरंधर: द रिवेंज’ कधी रिलीज होणार?

‘धुरंधर २’ येत्या १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय खन्नाच्या पात्राचा पहिल्या भागात मृत्यू झाला होता. त्यामुळे दुसऱ्या भागात तो फक्त काही ठिकाणी दिसणार आहे आणि त्याने आपलं शूटिंगही पूर्ण केलं आहे.

‘धुरंधर’च्या आतापर्यंत एकूण कमाईबद्दल…

‘धुरंधर’ने पहिल्या आठवड्यात २०७.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात २५३.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात १७२ कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या आठवड्यात अनुक्रमे १०६.५०, ५१.२५ आणि २६.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.