Vicky Kaushal’s latest photo with Katrina Kaif sparks debate: विकी कौशल व कतरिना कैफ सध्या लंडनला गेले आहेत. त्यावेळी एका चाहत्याने त्यांचा एक फोटो काढला. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये कतरिना कैफ गडद रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. तिने डोळ्यांवर गॉगलही लावल्याचे पाहायला मिळत आहे; तर विकी कौशलची वाढलेली दाढी, डोक्यावर टोपी आणि गॉगल, असा त्याचा लूक आहे.
नेटकरी काय म्हणाले?
आता या जोडप्याचा लूक समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी विकीचा लूक पाहून त्याची खिल्ली उडवली आहे. तसेच, काहींनी पुरुष आणि महिलांना त्यांच्या दिसण्यावरून वेगळ्या पद्धतीने वागवले जाते, त्यांच्यात दुजाभाव केला जातो. महिला व पुरुषांना वेगवेगळे निकष लावले जातात, असे म्हटले आहे. कतरिना आई झाल्यानंतर तिचे वजन वाढले आहे. तिच्या दिसण्यावरून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आता हा नवीन फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले, “आता विकीच्या लूकवरून त्याला कोणी ट्रोल करणार नाही. कारण- ट्रोलिंग फक्त त्याच्या पत्नीसाठीच राखून ठेवले आहे.” तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पुरुष आणि महिला कलाकारांना वेगवेगळे निकष का लावले जातात, असा प्रश्न विचारला. महिलांनी कायम विशिष्ट पद्धतीनंच दिसावं, अशी अपेक्षा का केली जाते? पुरुष कलाकारांच्या बाबतीत मात्र असे निकष का लावले जात नाहीत? अशाही कमेंट नेटकऱ्यांनी केल्या.
काही दिवसांपूर्वी कतरिनाला तिच्या दिसण्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. आता विकी व तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कतरिनाने काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये तिच्या ब्यूटी ब्रँडला वर्ष पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात तिने सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेबद्दल वक्तव्य केले होते.
कतरिना म्हणाली होती, “सोशल मीडियावर आपल्याबद्दल तयार होणाऱ्या मतांचा आपल्या आत्मसन्मानावर आणि स्वतःच्या मूल्यावर परिणाम होऊ नये, याची आपण खूप काळजी घेतली पाहिजे. कारण- सोशल मीडियावर असंख्य लोकांची वेगवेगळी मतं असतात. आपण प्रत्येकाच्या मतानुसार वागण्याचा प्रयत्न केला, तर स्वतःचे निर्णय घेण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. वैयक्तिक आयुष्यात मलाही अनेकदा टीका आणि नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे; पण त्या टीकेनुसार मी माझे निर्णय घेतले असते, तर भीतीमुळे मी आयुष्यात पुढेच जाऊ शकले नसते.”
दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना मुलगा झाला. विहान असे त्याचे नाव आहे.
