Vidya Balan Maharashtrachi Hasyajatra Reel : मराठी मनोरंजन विश्वातील विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा हा जबरदस्त लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने केवळ मराठी प्रेक्षकांचीच नव्हे, तर बॉलीवूड कलाकारांचीही मने जिंकली आहेत. या कार्यक्रमातील विनोद, कलाकारांची खास शैली आणि भन्नाट स्किट्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आता बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनलाही या कार्यक्रमाची भुरळ पडली असून, तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तीलएका लोकप्रिय स्किटवर रील करीत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यातील विद्या बालनचा मराठमोळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतील उतरला असून, त्यावर अभिनेत्री सई ताम्हणकरने खास कमेंट केली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने यापूर्वीही अनेक मराठी गाणी आणि मराठी चित्रपटांवरील संवादांवर रील्स तयार केल्या आहेत. आता पुन्हा एकदा तिने मराठमोळा अंदाज दाखवीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एका लोकप्रिय स्किटवर रील शेअर केली आहे. विनोदी अभिनेता ओंकार भोजने याच्या गाजलेल्या स्किटमधील संवादांवर विद्या हिने हुबेहूब अभिनय केला असून, तिच्या या रीलला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यावर अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी कमेंट केल्या आहेत.

ओंकार भोजनेच्या ‘या’ स्किटवर बनवलं रील

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील ओंकार भोजने हा कलाकार लोकप्रिय असून, त्याच्या विनोदांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळते. त्याची भुरळ आता अभिनेत्री विद्या बालनलादेखील पडली आहे. ओंकारचे ‘काय लागतं जगण्यासाठी? हे स्किट चांगलंच व्हायरल झालं होतं. “अन्न, वस्त्र, निवारा बस्स… टीव्ही लागतो. बस्स… अन् इकडे-तिकडे फिरायला बाईकपण लागते आणि त्या बाईकमध्ये टाकायला पेट्रोलपण लागतं. रिचार्ज करायला पैसे लागतात. जेवायला दर महिन्याला चायनीज लागतं. बापरे! लई काय काय लागतंय”, असं हे विनोदी स्किट असून, त्यावर विद्याने हुबेहूब अभिनय करीत रील केली आहे. त्यासह विद्याने ‘एवढंच हवे आहे जगण्यासाठी… हा हा हा’, असे मराठीमध्ये कॅप्शन लिहिले आहे.

विद्या बालनच्या या रीलवर अभिनेत्री सई ताम्हणकरच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सईने आनंद व्यक्त करीत “येस मॅम” अशा आशयाची कमेंट केली. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिनेही इमोजीसह “वोह…” अशी प्रतिक्रिया दिली आहे. विद्या बालनचा हा मराठमोळा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले असून, तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच विद्या बालन आणि ओंकार भोजने यांचे एकत्र स्किट पाहायला आवडेल, अशा अनेक कमेंट्सही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील भूमिकेने वेधले लक्ष

अभिनेत्री विद्या बालन ही नुकतीच ‘राजा शिवाजी’ चित्रपटामध्ये झळकली होती. रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमामध्ये तिने बडी बेगमची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले. लवकरच अनिस बाझमी दिग्दर्शन करीत असलेल्या एका चित्रपटामध्ये विद्या बालन काम करणार आहे. त्यामध्ये ती अक्षय कुमार व राशी खन्ना यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच केरळमध्ये पूर्ण झाले आहे; मात्र चित्रपटाच्या नावाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.