Vidya Malavade Personal Life Secrets: बॉलिवूड आणि ओटीटी विश्वातील लोकप्रिय चेहरा विद्या माळवदे आज तिच्या फिटनेस आणि अभिनयामुळे चर्चेत असते, मात्र या यशामागे एक मोठा वैयक्तिक संघर्ष दडलेला आहे. वयाच्या २४ व्या वर्षी पायलट अरविंद सिंह बग्गा यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या विद्याचे आयुष्य एका विमान अपघाताने बदलून टाकले. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षात पतीचे निधन झाल्याने विद्या वयाच्या २७ व्या वर्षी विधवा झाली. या धक्क्यातून सावरताना तिला आत्महत्येचे विचारही शिवले होते. मात्र, वडील आणि योगाच्या मदतीने तिने स्वतःला सावरले. ‘मिस्मॅच्ड’ फेम या अभिनेत्रीचे दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्याशी असलेले नाते आणि तिचा विमान प्रवासापासून ते सिनेसृष्टीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
खरं तर काही कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहतात. अनेकांच्या आयुष्यात अशा वेदनादायी घटना घडतात, ज्यातून सावरणं कठीण असतं. लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री विद्या माळवदेच्या बाबतीतही असंच घडलं. ती अवघ्या २७ व्या वर्षी विधवा झाली.
विद्याने ‘चक दे इंडिया’ चित्रपटात काम केलं होतं. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने विद्याला ओळख मिळवून दिली. विद्या प्राजक्ता कोळीच्या ‘मिस्डमॅच’ या गाजलेल्या सीरिजमध्ये ‘झीनत करीम’ ही भूमिका साकारली आहे. विद्या सिनेविश्वात येण्याआधी एअरहोस्टेस होती. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या चढ-उतारांनंतर तिने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. तिने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे.
२७ व्या वर्षी पतीला अपघातात गमावलं
विद्या एअरहोस्टेस म्हणून काम करत होती, त्याचदरम्यान तिची भेट कॅप्टन अरविंद सिंह बग्गाशी झाली, तो पायलट होता. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी १९९७ मध्ये लग्न केलं. तेव्हा विद्या २४ वर्षांची होती. दोघेही वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते, मात्र लग्नानंतर तीन वर्षांनी २००० साली विद्याच्या पतीचे प्लेन क्रॅशमध्ये निधन झाले.
पतीचा मृत्यू झाला, त्यावेळी विद्या जर्मनीत होती. पतीच्या निधनाबद्दल समजताच विद्याला धक्का बसला आणि तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. तिने आत्महत्या करायला झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या, असं म्हणतात. पण तिला तिच्या वडिलांनी असं धक्कादायक पाऊल उचलण्यापासून रोखलं. विद्या नंतर हळूहळू सावरली आणि तिने आयुष्यात पुढे जायचं ठरवलं.
विद्या माळवदेचं दुसरं लग्न
विद्याने या दुःखद घटनेतून सावरण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घेतली. पतीच्या निधनानंतर तिने एअर होस्टेसची नोकरी सोडली. त्यानंतर तिने काही मॉडेलिंग असाइनमेंटमधून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. काही प्रोजेक्ट केले, २००९ मध्ये तिने ‘रामजी लंडनवाले’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय दायमा यांच्याशी दुसरं लग्न केलं.
विद्या माळवदे व स्मिता पाटील कनेक्शन
५३ वर्षांच्या विद्याला मूलबाळ नाही. विद्याचं दिवंगत स्मिता पाटील यांच्याशी एक खास कनेक्शन आहे. विद्या माळवदे ही दिवंगत दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांची भाची आहे. तिचे वडील मोहन माळवदे हे स्मिता पाटील यांचे चुलत भाऊ होय.
