Vijay Varma Viral Video: विजय वर्मा सध्या त्याच्या ‘मटका किंग’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये त्याच्याबरोबर क्रितिका कामरा, सई ताम्हणकर, गुलशन ग्रोव्हर, सिद्धार्थ जाधव, जेमी लिव्हर असे अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

‘मटका किंग’ या वेब सीरिजमधील अनेक सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या सगळ्यात विजय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तमन्ना भाटिया आणि विजय एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. ते अनेक कार्यक्रमांना एकत्र उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. आता विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याच्याबरोबर एक अभिनेत्री दिसत आहे.

तमन्ना भाटियाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर विजय वर्मा ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट?

विजयबरोबर व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आलिया कुरैशी असे आहे. आलिया आणि विजय जपानी पद्धतीच्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर ते कारमध्ये गप्पा मारतानादेखील दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. विजय आणि आलिया रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. मात्र, विजय व आलियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते फक्त मित्र आहेत की रिलेशनशिपमध्ये आहेत, याबद्दल त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

आलिया कुरैशी कोण आहे?

आलिया मुंबईतील रहिवासी आहे. तिने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. तसेच, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. ती गायिका आणि गीतकारही आहे. याबरोबरच ती अभिनय क्षेत्रातही काम करताना दिसते.

आलियाने नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘एटर्नली कंफ्यूज़्ड अँड इगर फॉर लव्ह’मधून अभिनयात पदार्पण केले. ही वेब सीरिज २०२२ मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यानंतर ती शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमात दिसली होती. यामध्ये तिने जान्हवी ही भूमिका साकारली होती.

अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विजय वर्माबरोबर दिसल्याने ती सध्या चर्चांचा भाग झाली आहे.