Vijay Varma Casting Couch Experience: बॉलीवूडच्या सिनेमांमध्ये काम करणं आणि स्टार होणं अशी स्वप्न तर खूप तरुण-तरुणी पाहत असतात, पण प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतातच असं नाही. मुंबई ही स्वप्नांची दुनिया असून तेथील बॉलीवूड इंडस्ट्री ही नवोदित कलाकारांना नेहमीच खुणावत असते. पण, येथे येऊन काम मिळवणं आणि सिनेमांमध्ये झळकणं यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. बॉलीवूडचा प्रवास हा बाहेरून आलेल्या कलाकारांसाठी खूप संघर्ष आणि अडचणींनी भरलेला असतो. यातून मार्ग काढून स्टार होणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. तरीही बॉलीवूडमध्ये असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत, ज्यांचा आधी सिनेविश्वाशी काहीही संबंध नसताना त्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी धडपड ते लोकप्रिय कलाकार असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे विजय वर्मा. विजयने त्याच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याने अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमधून त्याच्या अभिनयाची छाप पाडली आहे. आज त्याचा मोठा चाहता वर्ग असून तो यशाच्या शिखरावर आहे. पण, सुरुवातीच्या काळामध्ये त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. मॉडेल म्हणून कामाची सुरुवात करताना त्याला काही वाईट अनुभव आल्याचं विजयने सांगितलं. यावेळी त्याच्याबरोबर घडलेल्या एका घटनेमुळे तो पूर्णपणे निराश झाल्याचं विजय वर्मानं सांगितलं आहे.
विजय वर्माने सांगितले अनुभव
विजय वर्माने करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्याबरोबर कास्टिंग काऊचसारखा प्रकार घडल्याचे सांगितले आहे. प्रखर गुप्ता यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विजयने त्याचा संघर्ष आणि इंडस्ट्रीतून आलेले कटू अनुभव सांगितले आहेत. तो म्हणाला, “हैदराबादमध्ये मॉडेलिंग करण्याचा प्रयत्न होता. ते अगदी छोटं काम होतं, पण मला आवड होती म्हणून मी सुरुवात केली. पण, तेथील मॉडेल कोऑर्डिनेटर खूपच विचित्र होता. त्याने माझ्याबरोबर चुकीचं वागण्यास सुरुवात केली. म्हणजे त्याने मला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न केला.”
पुढे तो म्हणाला, “त्या मॉडेल कोऑर्डिनेटरने चुकीचा स्पर्श केल्यानंतर मी त्याला विरोध केला आणि त्याला विचारलं, हे काय करतोय? हे काय सुरू आहे? पण त्या घटनेमुळे खूप खचून गेलो होतो आणि निराश झालो होतो. त्यावेळी मी स्वतःचीच समजूत काढली. या क्षेत्रात राहायचं असेल आणि अभिनय करायचाच असेल तर या सगळ्याला सामोरं जावंच लागेल, असं मी स्वतःला समजावलं. पण, अभिनय क्षेत्रामध्ये वाटचाल करणं सहजसोप नव्हतं.”
पुढे विजय वर्मा म्हणाला, “यानंतर मी हैदराबाद येथील ‘सूत्रधार स्कूल ऑफ ॲक्टिंग’मध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी मला संधीच दिली नाही. अभिनय करणं हे दोन दिवसांचं काम नाही म्हणत मला नकार दिला. यानंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केला. शेवटच्या राऊंडमध्ये येऊनही नंतर मला नकार देण्यात आला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, फक्त स्वप्न पाहिलं म्हणून ते पूर्ण होत नाही, प्रत्येक वेळी आपल्याला हवं ते मिळेलच असं नसतं.”
विजय वर्माने निर्माण केली स्वतंत्र ओळख
यानंतर विजय वर्माने पुन्हा एकदा एफटीआयआयमध्ये अर्ज केला आणि त्याची निवड झाली. यावेळी त्याने अभिनेता राजकुमार राव आणि जयदीप अहलावत यांच्याबरोबर अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिटगाव’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पुढे ‘पिंक’, ‘गली बॉय’, ‘डार्लिंग्स’, ‘जाने जान’, ‘मर्डर मुबारक’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली. याचबरोबर ‘मिर्झापूर’ आणि ‘काला पानी’ अशा लोकप्रिय वेब सीरिजमधील भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. नुकताच तो नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’मध्ये झळकला होता. आता, विजय वर्माने बॉलीवूडमध्ये त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
