Vijay Varma poses with Golden Toilet: सोशल मीडियावर अनेक ट्रेंड सतत येत असतात. एआयने तयार केलेले फोटो ते विविध पोशाखातील फोटो शेअर करणे असो, सामान्यांपासून ते अनेक लोकप्रिय कलाकार या ट्रेंडमध्ये सहभागी होत असतात.

आता सध्या सोशल मीडियावर २०१६ मधील फोटो शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये अनेक कलाकारांनीदेखील त्यांचे २०१६ मधील फोटो शेअर केले आहेत. तेव्हा ते कसे दिसायचे, ते तेव्हा काय करत होते, अशा अनेक आठवणी कलाकारांनी फोटोंच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. तसेच काही खास क्षणांचे फोटोदेखील शेअर केले आहेत.

या सगळ्यात विजय वर्माने शेअर केलेल्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे. विजय वर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर करत २०१६ मधील त्याच्या आयुष्यातील काही खास क्षणांची झलक दाखविली आहे. या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांच्या घरातील एक फोटोदेखील शेअर केला आहे. तो फोटो पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

विजय वर्माने शेअर केले अमिताभ बच्चन यांच्या बाथरूममधील फोटो

विजयने प्रत्येक फोटो कोणता आहे, याबद्दलही लिहिले आहे. २०१६ हे वर्ष माझ्यासाठी मैलाचा दगड ठरले. मला अमिताभ बच्चन आणि शूजित दा यांच्याबरोबर ‘पिंक’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सचिन तेंडुलकर यांच्याशी भेट झाली. अमिताभ बच्चन यांच्या घरातील गोल्डन टॉयलेटबरोबर सेल्फी काढली.

माझ्या जिममधील मित्रांना भेटलो. माझा हिरो इरफान खान याच्याशी भेट झाली. ‘यारा’ चित्रपटात काम केले. ‘नैना बावरे’ या म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले. त्याने पुढे असेही लिहिले की, एकूणच मला नव्यानेच मिळालेल्या प्रसिद्धीचा मनसोक्त आनंद घेतला.

त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सचिन तेंडुलकर, इरफान खान दिसत आहेत. तसेच त्याच्या जवळचे इतर काही लोकही दिसत आहेत. याबरोबरच त्याच्या करिअरमधील महत्त्वाच्या गोष्टी २०१६ मध्ये घडल्याचे पाहायला मिळत आहे. ‘पिंक’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री तापसी पन्नूची झलकदेखील पाहायला मिळत आहे. राजकुमार राव, आयुष्मान खुराना यांच्याबरोबरचेदेखील फोटो पाहायला मिळत आहे.

नेटकरी म्हणाले…

विजयच्या या पोस्टवर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे, तर अनेकजण त्याने गोल्डन टॉयलेटबरोबर घेतलेल्या सेल्फीबद्दल कमेंट्स करत आहेत.

एकाने हसण्याच्या इमोजी शेअर करत लिहिले, “ते गोल्डन टॉयलेट”, दुसऱ्याने लिहिले, “पहिल्यांदा विजयने लक्झरी टॉयलेट पाहिले आणि त्याला तिथे सेल्फी घ्यावीशी वाटली”, आणखी एकाने लिहिले, “गोल्डन टॉयलेट हे मुख्य पात्र आहे”, तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केली.

दरम्यान, विजय वर्मा चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमधील विविध भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतो.