Vijay Varma Red Flag Controversy IFFM Melbourne: बॉलीवूड अभिनेता विजय वर्मा हा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवणाऱ्या विजयचा मोठा चाहतावर्ग आहे. सिनेमांबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची अनेकदा चर्चा रंगते. काही महिन्यांपूर्वी विजय वर्मा हा लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाला डेट करत होता. विजय व तमन्नाच्या या नात्याची खूप चर्चा रंगली; मात्र नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. आता विजयला भर मंचावर एका इन्फ्लुएन्सरने ‘रेड फ्लॅग’ म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न’ आयएफएफएम (IFFM) मध्ये विजय वर्माने सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार जिंकला. ‘मटका किंग’मधील त्याच्या प्रभावी अभिनयासाठी त्याचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आल्यानंतर विजयबरोबर एक मजेशीर घटना घडली. अभिनेत्री व कंटेंट क्रिएटर डॉली सिंगबरोबर संवाद साधत असताना ती मंचावर विजयला ‘रेड फ्लॅग’ म्हणाली. डॉली व विजय यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विजय वर्मा देशातील सर्वांत मोठा ‘रेड फ्लॅग’

इन्फ्लुएन्सर डॉली सिंहने विजय वर्माला ऑनस्क्रीनवरील ‘सगळ्यात मोठा रेड फ्लॅग’, असे संबोधित केले. ती म्हणाली, “खरं तर अभिनेता हा चाहत्यांचा नॅशनल क्रश होतो; पण तू तर देशातील सर्वांत मोठा ऑनस्क्रीन ‘रेड फ्लॅग’ बनला आहेस कारण- विजय एखाद्या शो किंवा चित्रपटात दिसला की, आता कोण अडचणीत येणार आणि पुढे कोणाला मारणार, असा विचार प्रेक्षकांच्या मनात येतो. त्यामुळे तू आमच्यासाठी स्क्रीनवरचा सर्वांत मोठा चालता-बोलता ‘रेड फ्लॅग’ आहेस.”

विजय वर्माने डॉली सिंहला दिले उत्तर

डॉलीच्या या वक्तव्यावर विजयने मिश्कील अंदाजात प्रतिक्रिया दिली. विजय वर्माने डॉलीच्या प्रश्नाचे मजेशीर अंदाजात उत्तर देत म्हटले, “फक्त लाल कापडाचा एक तुकडा विकत घेऊन घरी ठेवा आणि तुम्हाला हवे तितके रेड फ्लॅग तयार करा.” विजयचे हे उत्तर ऐकल्यानंतर डॉलीने लगेच त्याला ‘लेम जोक’ म्हटले. त्यावर विजयने पुन्हा मिश्कील अंदाजात उत्तर देत म्हटले, “जसं मी तू केलेल्या वाईट कौतुकाकडे दुर्लक्ष केलं, तसाच हा जोक आहे.” विजयच्या या उत्तरावर उपस्थित सर्व जण जोरजोरात हसू लागले.

विजय वर्माने प्रभावीपणे साकारल्या नकारात्मक भूमिका

विजय वर्माने नायक म्हणून सिनेविश्व गाजवले असून, त्याच्या नकारात्मक भूमिकाही तेवढ्याच गाजल्या आहेत. विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः त्याच्या ग्रे शेड्स असलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘डार्लिंग्स’पासून ‘दहाड’पर्यंत विजयने पडद्यावर अनेक नकारात्मक भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत.

दरम्यान, विजय वर्माने ‘मटका किंग’ या क्राईम ड्रामा ओटीटी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ती प्रदर्शित झाली आहे.