Sushmita Sen Vikram Bhatt Relationship : अभिनेत्री व मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिच्या रिलेशनशिपची सध्या जोरदार चर्चा आहे. ललित मोदी यांनी सुष्मितासह असणाऱ्या नात्यावर भाष्य केल्यानंतर आता आणखी एका चित्रपट दिग्दर्शकाने त्यांच्या रिलेशनशिपच्या आठवणी शेअर केल्या आहेत. बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या चित्रपटातील सह-दिग्दर्शकासह सुष्मिताचे नाव जोडले गेले होते. ‘मिस युनिव्हर्स’ला डेट करीत असलो तरी खिशामध्ये काहीच पैसे नसल्याचे दिग्दर्शक विक्रम भट्ट म्हणाले आहेत.
१९९४ साली मिस युनिव्हर्स झाल्यानंतर १९९६ साली सुष्मिता सेनने ‘दस्तक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण केले. या चित्रपटामध्ये तिने एका माजी मिस युनिव्हर्सची भूमिका साकारली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नसला तरी सुष्मिताच्या अभिनयाने सर्वाचे लक्ष वेधले होते. दस्तक या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले असून, विक्रम भट्ट यांनी त्याचे सह-दिग्दर्शन केले होते. पहिल्याच चित्रपटामध्ये सुष्मिताचे नाव विक्रमसह जोडले गेले. विक्रम भट्ट यांचा पत्नी अदितीबरोबर घटस्फोट झाल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. सुष्मितासह असलेले नाते व त्यांच्या आठवणी विक्रम भट्ट यांनी सांगितल्या आहेत.
विष विकत घ्यायलाही पैसे नव्हते – विक्रम भट्ट
सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या एका मुलाखतीत, विक्रम भट्ट यांनी करिअरमध्ये आलेले चढ-उतार आणि सुष्मिता सेनसह असलेल्या नात्याबद्दल भाष्य केले आहे. मोठ्या प्रकल्पांचे दिग्दर्शन करूनही आणि बड्या व्यक्तींशी संबंधित असूनही, त्यांना अनेकदा पैशांची अडचण असायची, असा खुलासा त्यांनी केला. विक्रम म्हणाले, “मी तेव्हा कठीण काळातून जाणारा दिग्दर्शक होतो. माझ्याकडे विष विकत घ्यायलाही पैसे नव्हते. एका बाजूला मी आमिर खानला दिग्दर्शन करत होतो आणि दुसऱ्या बाजूला ‘मिस युनिव्हर्स’ला डेट करत होतो; पण माझ्या खिशात मात्र एक पैसा नव्हता.”
एखाद्या फकिरासारखं आयुष्य जगलो – विक्रम
पुढे ते म्हणाले, “त्या काळी माझी आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. मला आठवतंय की, एखादी सीडी विकत घ्यायलाही माझ्याकडे पैसे नसायचे. मी एखाद्या फकिरासारखं आयुष्य जगलो आहे,” अशा भावना विक्रम भट्ट यांनी व्यक्त केल्या आहेत. १९९८ साली सुष्मिताला डेट करीत असतानाच विक्रम यांनी आमिर खान व राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गुलाम’ चित्रपट दिग्दर्शित केला होता.
प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम अन् आदर
रिलेशनबाबत बोलताना विक्रम भट्ट म्हणाले की, आयुष्यात जे कोणी आले, त्यांनी माझ्या आयुष्यात नक्कीच चांगले केले. माझ्याकडे हिरावून घेण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे जेपण लोक आयुष्यामध्ये आले, त्यांनी प्रेम व वेळ दिला; तर काहींनी धडा दिला. आज जेव्हा मागे वळून बघतो, तेव्हा आयुष्यातील त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम आणि आदर वाटतो, अशा भावना दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी व्यक्त केल्या आहेत.
