चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना ७ डिसेंबर २०२५ रोजी ३० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात राजस्थान पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्या दोघांना जामीन मिळाला. आता विक्रम भट्ट यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून उदयपूर सेंट्रल जेलमध्ये घालवलेला वेळ आणि जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत बिघडलेल्या प्रकृतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

विक्रम भट्ट यांनी सांगितलं की तुरुंगात असताना तीन आठवड्यांनंतर, एका रात्री बॅरक नंबर १० मध्ये त्यांना खूप ताप आला आणि थंडी वाजू लागली, त्यामुळे त्यांना जाग आली. चार ब्लँकेट पांघरूनही त्यांना थंडी वाजत होती. त्यांची अवस्था पाहून इतर कैद्यांनीही त्यांना स्वतःची ब्लँकेट दिली. त्यांनी औषध घेतले, तरीही त्यांचा ताप कमी झाला नाही.

तुरुंगातील रुग्णालयात थर्मामीटरही नव्हता

“दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुरुंगातील रुग्णालयात गेलो, पण तिथे थर्मामीटरही नव्हता. त्यांनी माझे ऑक्सिजन चेक केलं आणि सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. मला वाटलं ते गंमत करत आहेत. मला ‘अॅक्सिअल स्पॉन्डिलायटिस’ (Axial Spondyloarthritis) नावाचा आजार आहे आणि अशा स्थितीत ताप आल्यास माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. शेवटी डॉक्टरांनी मला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली, पण तरीही मला नेण्यासाठी कोणीही आलं नाही,” असं विक्रम भट्ट यांनी सांगितलं.

उपचारांना झालेल्या उशिराबद्दल विक्रम भट्ट यांनी लिहिलं, “सुरुवातीला पोलीस एका व्हीआयपी व्यक्तीच्या सुरक्षेत व्यग्र होते. त्यानंतर ते एका आदिवासी मेळ्याच्या नियोजनात गुंतले होते. दिवस सरत गेले आणि मी बॅरेकमध्ये त्यांची वाट पाहत राहिलो. मी तापाने होणाऱ्या वेदनेत दिवस ढकलत होतो.”

आहारात बदल आणि देवीला प्रार्थना

अशा कठीण परिस्थितीत विक्रम भट्ट यांनी आहारात बदल केले आणि देवाकडे प्रार्थना केली. त्यांनी आपल्या जेवणातून तेल व मीठ पूर्णपणे बंद केले आणि भरपूर पाणी पिण्यास सुरुवात केली. एका देवीच्या फोटोसमोर बसून त्यांनी प्रार्थना केली. “जर तुझे अस्तित्व असेल, जर माझ्या प्रार्थनेला काही अर्थ असेल, तर कोणताही चमत्कार घडवून दाखव. मला इथं मरायचं नाही. माझ्या मुलांना, पत्नीला आणि ९० वर्षांच्या वडिलांना माझी गरज आहे.”

अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तराने चक्रावले विक्रम भट्ट

प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी देवीचे आभार मानले. पुढे त्यांनी एका अधिकाऱ्याला उपचारांना झालेल्या विलंबाबद्दल विचारलं. “मी विचारलं की जर ही इमर्जेन्सी स्थिती असती तर तुम्ही काय केलं असतं? त्यावर अधिकारी म्हणाला, ‘ओह, मग आम्ही तुम्हाला जेल गार्ड्सबरोबर पाठवले असते.’ याचा अर्थ ते मला आधीही दवाखान्यात नेऊ शकले असते. कदाचित त्यांना ते महत्त्वाचं वाटलं नसेल किंवा देवाची इच्छा होती की मी या अनुभवातून काहीतरी शिकावं,” असं विक्रम भट्ट म्हणाले.

“जेव्हा लोक म्हणतात की देव नाही, तेव्हा मी त्यांच्याशी वाद घालत नाही. मी फक्त हसतो, कारण काही चमत्कार फक्त तोच पाहू शकतो ज्याला त्यांची खरोखर गरज असते,” असं विक्रम भट्ट आपल्या अनुभवाबद्दल म्हणाले.