Vikrant Massey Sheetal Thakur Relationship Rules : कोणतंही नातं म्हटलं की वाद, कुरबुरी होतातच. नात्यात अनेक चढ-उतारही येतात. पण तरीही परस्पर प्रेम आणि आदर असेल तर नातं टिकून राहतं. बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅस्सी आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांच्या सुखी संसाराला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘मुसाफिर कॅफे’च्या प्रमोशनदरम्यान ‘बीबीसी हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने सुखी संसाराचं सिक्रेट सांगितलं. वर्षातील ३६५ पैकी ३५० दिवस चांगले जायला हवेत, असं विक्रांत म्हणाला. तसेच करिअरच्या सुरुवातीला ४०० स्क्वेअर फूटच्या घरात राहण्यापासून ते आर्थिक अडचणींपर्यंत पत्नी शीतलने खंबीर साथ दिल्याबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली.

विक्रांतने सांगितलं की संसार करताना काही गोष्टीत वाद होणारच. पण तो आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर एका वाईट दिवसाचा किंवा प्रसंगाचा परिणाम दुसऱ्या दिवसावर होऊ नये असा प्रयत्न करतात. त्यांचा नियम अगदी साधा आहे. जर वाद झालाच, तर तो त्याच दिवशी सोडवायचा, तो सतत पुढे न्यायचा नाही.

“३६५ पैकी ३५० दिवस चांगले जायला हवेत” – विक्रांत मॅस्सी

नात्यातील वादांबद्दल बोलताना विक्रांत म्हणाला, “वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३५० दिवस छान जायला हवेत; उरलेले १५ दिवस आपण सहज ॲडजस्ट करू शकतो. रात्री भांडण किंवा वाद झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो, तेव्हा तो वाद त्याच दिवशी तिथेच संपवायचा असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रकरण पुन्हा उकरावेसे वाटले, तरीही आम्ही तो वाद पुढच्या दिवसापर्यंत अजिबात ताणत नाही.”

४ वर्षांपूर्वी केलं विक्रांत व शीतलने लग्न

विक्रांत मॅस्सी आणि शीतल ठाकूर मागील अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. एका कॉमन मित्रामुळे त्यांची भेट झाली होती आणि नंतर त्यांनी ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’मध्ये एकत्र काम केलं. २०१९ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. आधी त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं होतं आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशात पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. २०२४ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा ‘वरदान’चं स्वागत केलं.

विक्रांत मॅस्सीच्या कठीण काळत शीतलने दिली साथ

विक्रांतच्या आयुष्यात शीतलने खूप खंबीर साथ दिली आहे. तो शीतलला बेस्ट फ्रेंड म्हणतो. इतकंच नाही तर करिअरमध्ये अनिश्चितता असताना तिने फक्त साथच दिली नाही तर आर्थिक मदतही केली, असं विक्रांत सांगतो. २०२५ मधील ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने म्हटलं होतं की, ४०० स्क्वेअर फूटच्या घरापासून ते ४,००० स्क्वेअर फूटच्या घरात राहण्यापर्यंत त्यांनी खूप मोठा प्रवास एकत्र केला. मात्र, त्यांच्या नात्यातील गोडवा आजही तसाच आहे.